शिवसैनिकांवरील कारवाईच्या प्रकरणी शिवसेना नेत्यांकडून पोलीस महासंचालकांकडे तक्रार
मुंबई – पुणे पोलिसांनी शिवसैनिकांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासह अन्य सेना नेत्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेऊन या घटनेत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यात झालेल्या आक्रमणानंतर पुणे पोलिसांनी ६ शिवसैनिकांना अटक केली; मात्र पोलिसांकडून कोणतीही चौकशी न करता, कोणतेही सबळ पुरावे नसतांना शिवसैनिकांना अटक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला. ‘या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल’, असे आश्वासन सेठ यांनी दिले.
सेठ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या दबावाखाली पुणे येथील पोलिसांनी शिवसैनिकांवर ३०७, ३२३ अशी गंभीर कलमे कोणतीही चौकशी न करता लावली आहेत. पुण्यासह माथेरान, सांगली आणि संभाजीनगर येथील शिवसैनिकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक होऊ नये. त्यांना त्यांचा आनंद लुटू द्या, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलले नाही; मात्र पुणे येथे आमदार उदय सामंत यांनी जाणीवपूर्वक शेवटच्या क्षणी आपला मार्ग पालटला असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे.