मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाची मेफेड्रॉनची निर्मिती करणार्या टोळीवर कारवाई !
|
मुंबई – मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने मेफेड्रॉनची (एम्डी) निर्मिती करणार्या टोळीवर कारवाई करून ७०० किलोहून अधिक मेफेड्रॉन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे मूल्य १ सहस्र ४०३ कोटी रुपयांपेक्षा अधिक असून या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
१. शिवाजीनगर येथे एका संशयिताकडून पोलिसांनी २५० ग्रॅम ‘एम्डी’ कह्यात घेतले. त्याच्या चौकशीच्या वेळी पोलिसांना अन्य आरोपींची माहिती मिळाली.
२. अमली पदार्थ पुरवठादाराकडून पोलिसांनी २ किलो ७६० ग्रॅम एम्डी जप्त केले. त्यानंतर या प्रकरणी २७ जून या दिवशी एका महिलेला अटक करण्यात आली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २ आणि ३ ऑगस्ट या दिवशी चौथ्या अन् पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली.
३. पाचव्या आरोपीने रसायनशास्त्रामध्ये शिक्षण घेतले असून वेगवेगळी रसायने एकत्र करून त्यांवर रासायनिक प्रक्रिया करून ‘एम्डी’ची निर्मिती केल्याचे मान्य केले. त्याच्याकडून एकूण ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचे १४०३ कोटी ४८ लाख रुपये किमतीचे ‘एमडी’सदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांच्या विळख्यातून महाराष्ट्राला सोडवण्यासाठी अशा टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई करणे आवश्यक ! |