‘सर्वनामांचे प्रकार’ आणि त्यांचा भाषेतील वापर !
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘प्राचीन काळी आर्यावर्ताची मातृभाषा आणि ज्ञानभाषा असलेल्या संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘सर्वनामे आणि त्यांची वैशिष्ट्ये’ पाहिली. आजच्या लेखात ‘सर्वनामांचे प्रकार’ जाणून घेऊ.
(लेखांक १० – भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/600287.html
३. सर्वनामांचे प्रकार
सर्वनामांचे पुढीलप्रमाणे एकूण ६ प्रकार आहेत. त्यांच्या नावांचे अर्थ आणि त्या प्रकारांची माहिती पुढे सविस्तर देण्यात आली आहे.
३ अ. पुरुषवाचक सर्वनामे
३ आ. दर्शक सर्वनामे
३ इ. संबंधी सर्वनामे
३ ई. प्रश्नार्थक सर्वनामे
३ उ. अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे
३ ऊ. आत्मवाचक सर्वनामे
आता सर्वनामांचा एकेक प्रकार विस्ताराने पाहू.
३ अ. पुरुषवाचक सर्वनामे : दैनंदिन जीवनात आपण अनेकांशी अनेक गोष्टींविषयी बोलत असतो. या बोलण्याच्या क्रियेमध्ये पुढील तीन घटक समाविष्ट असतात.
१. बोलणारी व्यक्ती
२. ज्यांच्याशी आपण बोलतो, त्या व्यक्ती
३. ज्यांच्याविषयी आपण बोलतो, त्या व्यक्ती, वस्तू अथवा अन्य गोष्टी
वरील तिन्ही घटकांना व्याकरणात ‘पुरुष’ असे म्हणतात. ‘बोलणारी व्यक्ती’ या घटकाला ‘प्रथमपुरुष’; ‘ज्यांच्याशी आपण बोलतो, त्या व्यक्ती’ या घटकाला ‘द्वितीयपुरुष’ आणि ‘ज्यांच्याविषयी आपण बोलतो, त्या व्यक्ती, वस्तू अथवा अन्य गोष्टी’ या घटकाला ‘तृतीयपुरुष’ असे म्हणतात. या तिन्ही पुरुषांमध्ये विविध नामे असतात. त्यामुळे अर्थात्च त्यांमध्ये सर्वनामेही असतात. या सर्वनामांना ‘पुरुषवाचक सर्वनामे’ असे म्हणतात. तिन्ही पुरुषांमधील ‘पुरुषवाचक सर्वनामां’ची माहिती पुढे दिली आहे.
३ अ १. प्रथमपुरुषवाचक सर्वनामे : बर्याचदा दोन-अडीच वर्षांची लहान मुले स्वतःचा उल्लेख स्वतःच्या नावाने करतात, उदा. छोटा आशीष म्हणतो, ‘‘आशीषला आईकडे जायचं आहे.’’ येथे तो ‘मला’ हे सर्वनाम वापरत नाही. मूल मोठे झाले की, बोलतांना स्वतःच्या नावाच्या जागी सर्वनाम वापरावयास शिकते. बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करतांना जी सर्वनामे वापरते, त्यांना ‘प्रथमपुरुषवाचक सर्वनामे’ असे म्हणतात, उदा. मी, माझे, आम्ही, आमच्या, आपण, स्वतः इत्यादी.
३ अ २. द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे : आपण ज्यांच्याशी बोलतो, त्यांना उद्देशून जी सर्वनामे वापरतो, त्यांना ‘द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे’ असे म्हणतात, उदा. तू, तुला, तुम्ही, तुम्हाला, आपण इत्यादी. एखाद्या आदरणीय व्यक्तीशी बोलतांना तिला उद्देशून ‘आपण’ हे सर्वनाम वापरले जाते. हे सर्वनाम असलेले वाक्य पुढे दिले आहे.
अमितने विचारले, ‘‘आपण थोडा वेळ विश्रांती घेता का ?’’
३ अ ३. तृतीयपुरुषवाचक सर्वनामे : आपण ज्यांच्याविषयी बोलतो, त्या व्यक्ती अथवा वस्तू यांना उद्देशून जी सर्वनामे वापरतो, त्यांना ‘तृतीयपुरुषवाचक सर्वनामे’ असे म्हणतात, उदा. तो, ती, ते, त्या, त्यांना, त्यास इत्यादी.
३ आ. दर्शक सर्वनामे : जवळची किंवा दूरची व्यक्ती, वस्तू अथवा अन्य एखादी गोष्ट दाखवण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वनामांना ‘दर्शक सर्वनामे’ असे म्हणतात.
जवळची गोष्ट दाखवण्यासाठी हा, ही, हे, यांना, यांची इत्यादी सर्वनामे वापरतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. हा वर्तकांचा वाडा आहे.
२. या माझ्या मोठ्या वहिनी आहेत.
३. हे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत.
दूरची गोष्ट दाखवण्यासाठी तो, ती, ते, त्यांना, त्यांची इत्यादी सर्वनामे वापरतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. ती दूरवर दिसत आहे, ती शहरातील सर्वांत उंच इमारत आहे.
२. तो धृवतारा आहे.
३. ते पलीकडच्या टेकडीवरील मंदिर आमच्या आजोबांनी बांधले आहे.’
(क्रमशः पुढील शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२२)