विज्ञानाची प्रगती ?
सध्या समाजातील अनेक जण ‘फेसबूक’, ‘इंस्टाग्राम’, ‘लिंकडीन’ यांसारख्या सामाजिक माध्यमांवर सक्रीय आहेत. त्यांच्या अतीवापरामुळे अनेकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊन ‘फोमो’ (फियर ऑफ मिसिंग आऊट) हा आजार होत आहे. या आजाराचे स्वरूप ‘आपण इतरांपेक्षा मागे पडत असल्याची भावना आणि भीती निर्माण होणे’, असे आहे. ‘या आजाराचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोचले आहे’, असे तज्ञांचे मत आहे. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. चिंता, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, एकटेपणा, गर्दीची भीती, न्यूनगंड, असमाधानी वृत्ती, इतरांपेक्षा आपल्याजवळ न्यून असल्याची जाणीव होणे यांमुळे हा आजार रुग्णांना होतो. या आजाराची तीव्रता आणि प्रमाण पाहिल्यास ‘यावर वेळीच उपाययोजना न काढल्यास देशाची स्थिती काय होईल ?’ याचा आपण विचारच करू शकत नाही. ‘व्यक्ती स्वस्थ, तर देश स्वस्थ’, हे सर्वांनीच मनावर बिंबवायला हवे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत नवीन शोध लागतात, त्या वेळी त्याचे लाभ लक्षात येतात; परंतु त्यांचा अतीवापर झाल्यावर होणारे दुष्परिणाम पाहिल्यास ‘ही खरी प्रगती का ?’, असा प्रश्न पडतो. कोणत्याही गोष्टीचा वापर मर्यादेमध्ये करणे, यासाठी मनावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक असते. ते नसेल, तर काय परिणाम होतो, हे वरील संशोधनातून लक्षात येते. ‘फोमो’वर उपाययोजना म्हणून ‘आपली बलस्थाने आणि मर्यादा समजून घेऊन त्या स्वीकारल्यास ‘फोमो’वर मात करता येते’, असे समुपदेशकांचे मत आहे, तसेच ‘प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर रहाणे आणि दैनंदिन जीवनात समाधानी रहाणे, यांमुळे या आजारावर मात करता येते’, असे मानसोपचारतज्ञांनी सांगितले आहे. दोघांचे मत वाचल्यानंतर ‘अशा प्रकारे कृती करणे सोपे आहे’, असे वरकरणी वाटले, तरी ते तेवढे सोपे नाही; कारण मनावर नियंत्रण ठेवणे पुष्कळ कठीण आहे. सध्या समाजमनावर असलेला पाश्चात्त्य विचारसरणीचा पगडा आणि मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणाली यांमुळे बहुतांश जणांमधील ‘योग्य काय ? आणि अयोग्य काय ?’, याची समज निघून गेली आहे. ही समज आणून त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
मन सात्त्विक असेल, तर ते योग्य विचार करते आणि ते ग्रहणही करते. मन सात्त्विक होण्यासाठी ध्यान, धारणा, नामजपादी उपाय करणे आवश्यक आहे. नामजपामुळे मनातील अयोग्य विचारांची केंद्रे बोथट होऊन कालांतराने नष्ट होतात. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना नामजपाचे मूल्य ठाऊक नाही. त्यामुळे समाजमन अयोग्य विचार ग्रहण करत आहे. संस्कार ही गोष्टच लोप पावत चाललेली आहे. पूर्वीच्या काळी लोक साधना करत असल्यामुळे त्यांच्यावर संस्कार होते. समाज सात्त्विक होता, त्यांना योग्य-अयोग्य याची जाण होती आणि म्हणूनच भारत महासत्ता होता. भारताला पुन्हा महासत्ता बनवायचे असेल, तर धर्मशिक्षण देऊन समाज सात्त्विक होणे आवश्यक आहे. याचे महत्त्व प्रत्येकाने स्वतःवर बिंबवून त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही !
– वैद्या (सुश्री [कु.]) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.