परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बुद्धीच्या स्तरावर केलेल्या शंकानिरसनामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली साधना करण्याचा दृढनिश्चय केलेले नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे !
नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४१ वर्षे) हे अभियंता असून महावितरण आस्थापनात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत असूनही गुरूंवरील श्रद्धा आणि साधनेची तळमळ यांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत.
‘त्यांची साधना चालू होणे; बुद्धीवादी असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बुद्धीच्या स्तरावर त्यांचे शंकानिरसन केल्याने सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू करणे; परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक छोट्या गोष्टीमधून साधना कशी करायची ?, हे शिकवणे’ इत्यादींविषयी श्री. नीलेश नागरे यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सनातन संस्थेच्या सत्संगात सांगितलेले कृतीत आणणे आणि अनुभूती आल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी दृढ श्रद्धा निर्माण होणे
‘मी अभियांत्रिकी शाखेत शिकत असतांना सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. त्या वेळी मी सत्संगात सांगितलेली प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि त्याप्रमाणे कृती करत गेलो. त्यामुळे मला अनुभूती येऊन माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी दृढ श्रद्धा निर्माण झाली.
२. सनातन संस्थेत शिकवले जाणारे ‘अध्यात्म’ इतर संप्रदायांपेक्षा वेगळे वाटणे, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे एक अद्वितीय व्यक्तीमत्त्व आहे’, असे वाटणे अन् त्यांच्याकडून लहान लहान गोष्टींतून शिकायला मिळणे
मी सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी वेगवेगळ्या संप्रदायांच्या माध्यमातून साधना करत होतो; परंतु ‘सनातन संस्थेमध्ये शिकवले जाणारे ‘अध्यात्म’ हे वेगळे आहे’, असे मला वाटले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे एक वेगळे अद्वितीय व्यक्तीमत्त्व आहे’, असे प्रत्येक वेळी माझ्या मनाला वाटायचे. पूर्वी मला परात्पर गुरु डॉक्टर यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा करायला सांगायचे, उदा. खुंटीवर टॉवेल ठेवणे, टॉवेल दोन्ही टोके जुळवून वाळत टाकणे, चादरीच्या घड्या घालणे, फलक लावणे, प्रवचन घेणे.
३. सनातन संस्थेमध्ये सात्त्विक स्पंदने, भावपूर्ण कृती इत्यादींविषयी शिकायला मिळणे
जीवन जगतांना सात्त्विक स्पंदने म्हणजे काय ? ‘एखाद्या ठिकाणी गेल्यावर कसे वाटते ?’, याचे सूक्ष्म परीक्षण; छोट्या छोट्या कृतींतून साधना कशी होते ?; भावपूर्ण कृती, सातत्य, चिकाटी आणि तळमळ, इत्यादींविषयी मला शिकायला मिळाले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक जिज्ञासूचे शंकानिरसन करणे, त्यांनी दिलेली बुद्धीच्या स्तरावरील उत्तरे ऐकून पूर्ण समाधान होणे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याचा दृढ निश्चय होणे
पूर्वी काही वेळा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत प्रवास करण्याची संधी मिळाली. तेव्हा जिज्ञासूंनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ते देत असत. मी स्वतः बुद्धीवादी होतो. त्यामुळे त्यांनी बुद्धीच्या स्तरावर दिलेली उत्तरे ऐकून माझ्या बुद्धीचे समाधान झाले आणि मला आनंद मिळाला. त्यानंतर मी ‘पुढील काळात सनातन संस्था आणि गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करायची’, असा दृढनिश्चय केला. परात्पर गुरु डॉक्टर हे स्वतः मोठे बुद्धीवादी असल्याने आमच्यासारख्या छोट्या छोट्या बुद्धीवाद्यांच्या बुद्धीच्या स्तरावरील शंकांचे निरसन, उदा. देव आहे का ? साधना का करायची ? मानवी जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे ? अशा विविध प्रश्नांचे तात्काळ निरसन करून त्यांनी आम्हाला साधनेला लावले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
५. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या शंकानिरसनामुळे बुद्धीच्या पातळीवरील सहस्रो लोकांनी साधना करणे’, हेच त्यांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे’, असे वाटणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आज बुद्धीच्या पातळीवरील सहस्रो साधक, अभियंते, आधुनिक वैद्य, अधिवक्ते इत्यादी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत, हेच परात्पर गुरु डॉक्टरांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे’, असे मला वाटते.
६. सनातन संस्थेवर येऊ घातलेल्या बंदीच्या काळातही गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि त्यांच्यावरील ठाम श्रद्धेमुळे नियमितपणे साधना चालू ठेवणे
सनातन संस्थेवर येऊ घातलेल्या बंदीच्या काळात माझे मित्र, कार्यालयातील सहकारी, नातेवाईक आणि कुटुंबीय यांनी ‘आता तू सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू नकोस’, असे वारंवार सांगितले; परंतु ‘मी स्वतः गुरुदेवांना प्रत्यक्ष बघितले आहे. ओळखले आहे. जाणले आहे. सनातन संस्थेची शिकवण अनुभवली आहे’, या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर यायच्या. ‘माझ्या रक्तामध्ये सनातन संस्था आणि गुरुदेव आहेत अन् मुळात माझा जन्मच या कार्यासाठी झाला आहे’, असे मला नेहमी वाटायचे. त्यामुळे मी परत बुद्धीचा दृढनिश्चय करून शासकीय अधिकारी असलो, तरीही गुरुदेवांच्या कृपेमुळे नियमितपणे साधना चालू ठेवली.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध अनुभूती येणे आणि साधनेत टिकून रहाणे
मागील काही वर्षांपासून माझ्या साधनेमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. मला गुरुदेवांच्या कृपेमुळे विविध अनुभूती येतात. ‘केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या अगाध कृपेमुळे मी साधनेमध्ये टिकून आहे अन् त्यांनीच मला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून बाहेर काढले आहे’, असे मला नेहमी वाटते.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची पद्धत शिकवल्यामुळे साधकांचा उद्धार होणे अन् ‘कलियुगातील अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड कसे द्यायचे ?’, हे शिकायला मिळणे
पूर्वी मी केवळ नामस्मरण आणि सेवा करत असे. त्यामुळे माझ्यात विशेष पालट होत नव्हते. काळानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून एक प्रकारे सर्वांच्या जीवनाचा उद्धार केला आहे. चुका, स्वभावदोष, अहंचे पैलू, स्वयंसूचना इत्यादींचे लिखाण केल्यामुळे जीवन जगतांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन ‘कलियुगातील या अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड कसे द्यायचे ?’, हे मला शिकायला मिळाले. ‘गुरुकृपेमुळेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया माझ्या वृत्तीमध्ये निर्माण झाली’, असे मला नेहमीच वाटते.
९. महावितरण आस्थापनात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने शक्ती मिळणे
मी महावितरण आस्थापनात ‘उपकार्यकारी अभियंता’ या पदावर काम करत आहे. मला आस्थापनातील एक अधिकारी म्हणून विविध अडचणींना सामोरे जावे लागते, उदा. ग्राहकांची गार्हाणी, आस्थापनातील अभियंते आणि जनमित्र (लाइनमन – विद्युत् दुरुस्ती करणारे कर्मचारी) यांनी ओढलेले ताशेरे. असे असतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे सर्व गोष्टींना समर्थपणे तोंड द्यायची शक्ती मिळते. यातून मला ‘अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र आहे’, हे शिकायला मिळत आहे.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘परात्पर गुरुदेव, आपली महती कशी सांगावी ? आपली महती शब्दांत सांगणे अशक्य आहे. आपणासारखे महान गुरु या जीवनात लाभले, हेच आमचे परम भाग्य आहे आणि याचा अनुभव केवळ ज्याने त्याने घ्यायचा, हे मात्र तितकेच खरे ! हे गुरुदेवा, खरोखरच सर्व साधकांना अशा प्रकारची अनुभूती आपण देत आहात. आपणच आम्हा सर्व साधकांना पुढील साधनेची दिशा देऊन आमचे बोट धरून आपल्याला अपेक्षित अशी आमची प्रगती करून घ्यावी’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– श्री. निलेश नागरे, नाशिक (२८.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. |