देहली-कटरा या मार्गावरील ‘वन्दे भारत’ रेल्वेमध्ये मांसाहारावर बंदी !
या गाडीला देण्यात आले देशातील पहिले ‘सात्त्विक रेल्वे गाडी’चे प्रमाणपत्र !
नवी देहली – देहली-कटरा या मार्गावरील ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीमध्ये मांसाहार खाण्यावर आणि तेथे नेण्यावर रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. ही देशातील पहिली रेल्वेगाडी आहे, जिला ‘सात्त्विक’ असे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ही रेल्वे पूर्णपणे शाकाहारी आहे. रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थांची सुविधा पुरवणार्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि ‘भारतीय सात्त्विक परिषद’ यांच्यात यापूर्वीच एक करार करण्यात आला आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार हळूहळू धार्मिक स्थळी जाणार्या इतर गाड्याही सात्त्विक केल्या जातील. श्री वैष्णोदेवी मंदिरात जाण्यासाठी कटरा हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
१. अनेक प्रवाशांना रेल्वेमध्ये दिले जाणारे जेवण आवडत नाही; कारण त्यांना निश्चिती नसते की, येथे मिळणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी आणि आरोग्यदायी आहे का ? तसेच ‘गाडीमध्ये जेवण बनवतांना स्वच्छतेची किती काळजी घेतली गेली ?’, ‘शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे शिजवले जाते का ?’, ‘जेवण बनवण्यापासून ते ग्राहकांना पोचवण्यापर्यंतची प्रक्रिया काय असते ?’, असे अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात असतात. अशा प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने ‘सात्त्विक रेल्वे’ चालू केली आहे.
२. भारतीय सात्त्विक परिषदेचे संस्थापक अभिषेक बिस्वास यांनी सांगितले की, ‘वन्दे भारत’ रेल्वेला सात्त्विक प्रमाणपत्र देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्याअंतर्गत स्वयंपाक करण्याची पद्धत, स्वयंपाकघर, भांड्यांची देखभाल तपासण्यात आली. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात आले.