नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षांत १० सहस्र बालविवाह !
नंदुरबार – जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांत सर्वाधिक १० सहस्र मुलींचा बालविवाह झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यांपैकी २ सहस्र ३०५ मुलींना १८ वर्षांच्या आतच मातृत्व आले आहे. २ ऑगस्ट या दिवशी येथील जिल्हा परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्यांनी हा अधिकृत आकडा घोषित केला आहे.
५२ सहस्र ७७३ महिलांपैकी ९ सहस्र ९८३ मुलींचा बालविवाह झाल्याचे सर्वेक्षणातून उघड !
जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात कुपोषणाच्या सूत्रावरून अप्रसन्नता व्यक्त केली. कुपोषणासाठी बालविवाह हे मुख्य कारण ठरत असल्याचे सांगत ही आकडेवारी देण्यात आली. यात जिल्ह्यातील ५२ सहस्र ७७३ महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ९ सहस्र ९८३ मुलींचा म्हणजे १८.९६ टक्के मुलींचा बालविवाह झाला आहे. बालविवाह रोखण्याचे दायित्व महिला बालकल्याण विभाग आणि जिल्हा परिषद यांचे असते; मात्र ‘त्यात हलगर्जीपणा झाला आहे’, असे म्हटले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !
बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर विशेष दायित्व देण्यात आले होते. प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असतील, तर महिला बालकल्याण आणि ग्रामपंचायत विभाग यांनी ही माहिती वेळीच का पुढे आणली नाही ?’, असाही प्रश्न विचारला जात आहे.
संपादकीय भूमिकाबालविवाहामुळे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने दायित्व निश्चित केलेले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांवर बडतर्फीची कारवाई करून त्यांना कठोर शासन केले पाहिजे. |