पावसामुळे आश्रमातील भिंती किंवा साहित्य यांवर आलेली बुरशी पुसण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना !
‘पावसाळ्यात आश्रम किंवा सेवाकेंद्रे येथील खोल्या, सेवांचे कक्ष, आश्रम परिसर, सामूहिक प्रसाधनगृहे, मार्गिका, जिने, साधकांसाठी असलेली निवासस्थाने इत्यादी ठिकाणच्या भिंती किंवा अन्य साहित्य यांवर बुरशी येण्यास आरंभ होतो. त्यामुळे दायित्व असणार्या सेवकांनी आश्रमातील खोल्या, सेवांचे कक्ष, आश्रम परिसर, तसेच साधकांसाठी असलेली निवासस्थाने येथील भिंतींवरील बुरशी पुसण्याचे नियोजन ४.८.२०२२ ते १५.८.२०२२ या कालावधीत पूर्ण करावे. ऑगस्ट मासाप्रमाणेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासातही पुढीलप्रमाणे बुरशी पुसण्याचे नियोजन करावे.
१. बुरशी पुसतांना पुढील काळजी घ्या !
१ अ. बुरशी पुसतांना वापरायच्या कापडाच्या संदर्भात घ्यायची काळजी !
१. बुरशी पुसण्यासाठी रंग न जाणारे अथवा पांढरे कापड वापरावे. ते सुती (कॉटनचे) आणि स्वच्छ असावे.
२. बुरशी पुसतांना कापडाची एक बाजू खराब झाल्यावर कापडाची बाजू पालटून दुसर्या चांगल्या बाजूने बुरशी पुसावी. पूर्ण कापड खराब झाल्यास कापड पालटावे. खराब कापडाने भिंती किंवा वस्तू पुसल्यास बुरशी पूर्णपणे निघत नाही, तसेच भिंतींचा रंग किंवा वस्तू खराब होऊ शकतात.
१ आ. भिंतींवर आलेली बुरशी पुसतांना घ्यायची काळजी !
१. ‘ऑईल पेंट’ने रंगवलेल्या भिंतीवरील बुरशी काढतांना द्रव साबणाच्या (‘लिक्विड सोप’च्या) पाण्यात सुती कापड ओले करून ते पिळून घेऊन त्याने बुरशी पुसावी. नंतर स्वच्छ कोरड्या कापडाने भिंत पुसावी.
२. साध्या रंगाने रंगवलेली भिंत पुसतांना प्रथम केवळ स्वच्छ कोरड्या कापडाने पुसावी आणि तरीही बुरशीचे डाग न गेल्यास कापड साध्या पाण्यात ओले करून ते घट्ट पिळून घेऊन त्याने हलक्या हाताने अलगदपणे बुरशी पुसावी.
३. ओल आलेल्या भिंतींवर बुरशी आली असेल, तर ती स्वच्छ कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसावी.
४. बुरशी पुसतांना ‘भिंतीचा रंग खराब होणार नाही’, याची काळजी घ्यावी.
१ इ. आश्रमातील खोल्या, विभाग आणि परिसर येथील फर्निचर स्वच्छ करतांना घ्यायची काळजी !
१ इ १. सुक्या कापडाने पुसणे
१. आश्रमात असलेल्या साध्या फर्निचरवर (फर्निचरचे ‘साधे आणि पॉलिश’, असे दोन प्रकार असतात.) बुरशी आल्यास ती सुक्या कापडाने पुसावी.
२. चाकाच्या आसंद्यांचे (व्हिल चेअरचे) ‘कुशन’ अथवा सुखासनांचे (सोफ्याचे) ‘कुशन’ यांवर बुरशी आल्यास ती झटकून सुक्या कापडाने पुसून घ्यावी.
३. साधकांचे वैयक्तिक साहित्य, उदा. ‘बॅग’, खोके किंवा ‘सुटकेस’ इत्यादींना बुरशी आल्यास हे साहित्य कोरड्या कापडाने पुसावे.
१ इ २. ओल्या कापडाने पुसणे
१. प्लास्टिकच्या आसंद्या, फायबरच्या वस्तू आणि दारे यांवर बुरशी आल्यास कापड ओले करून ते घट्ट पिळून त्याने बुरशी पुसावी.
२. लोखंडी कपाटे, सनमायका लावलेले साहित्य, पॉलिश केलेले पटल (टेबल), दारे आणि आसंद्या (खुर्च्या) यांवरील बुरशी पुसतांना कापड ओले करून ते घट्ट पिळून त्याने बुरशी पुसावी.
३. ‘नेटलॉन’ला बुरशी आल्यास ते साबणाच्या पाण्यात अर्धा घंटा भिजत घालावे. नंतर ‘स्क्रबर’ने काळजीपूर्वक (जास्त जोराने घासू नये) घासून वाळत घालावे. ‘नेटलॉन’ पूर्ण वाळल्यावरच खिडक्यांना लावावे.
४. पडद्यांना बुरशी आल्यास ते साबणाच्या पाण्यात १५ – २० मिनिटे भिजत घालावेत. नंतर धुलाई यंत्रातून धुऊन वाळत घालावे किंवा ते ३० मिनिटे साबणाच्या पाण्यात भिजत घालून ब्रशने हलक्या हाताने घासून धुऊ शकतो. पडदे पूर्ण वाळल्यावरच पुन्हा लावावेत. (बुरशी आलेल्या पडद्यांच्या समवेत इतर कपडे धुऊ नयेत.)
५. साधकांच्या वैयक्तिक साहित्यातील ‘सुटकेस’ लेदरची किंवा प्लास्टिक कोटिंगची असेल, तर ओलसर कापडाने पुसून पुन्हा सुक्या कापडाने पुसावी.
२. बुरशी न येण्यासाठी घ्यायची काळजी !
अ. भिंती, लोखंडी कपाट, सनमायका लावलेल्या वस्तू, लाकडी कपाट, पॉलिश केलेले कपाट, तसेच साध्या लाकडाच्या वस्तू आणि आसंद्या यांची प्रत्येक आठवड्यातून २ – ३ वेळा तपासणी करावी. त्या वेळी वरील वस्तूंना बुरशी आली असेल, तर ती कोरड्या अन् पांढर्या रंगाच्या कापडाने पुसून घ्यावी.
आ. गाद्या आणि उशा प्रत्येक मासातून एकदा अन् दमटपणा अधिक असतो, त्या ठिकाणी १५ दिवसांतून एकदा ‘व्हॅक्युम क्लिनर’ने स्वच्छ कराव्यात.
इ. कपडे किंवा अन्य कोणतेही साहित्य ओले झाल्यास ते पूर्ण वाळवावे. अशा साहित्याचा अंदाज घेऊन ते कापडाने पुसून घेणे, दोरीवर वाळत घालणे, पंख्याखाली वाळत ठेवणे इत्यादी उपाययोजना करू शकतो.
– श्री. गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२२)