कै. मुकुंद ओझरकर यांना ‘नामजप अंतरात झिरपत असून स्वतः निर्गुणात जात आहे’, अशी आलेली अनुभूती
प.पू. डॉक्टरबाबा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले),
शिरसाष्टांग नमस्कार !
२९.३.२०२१ या दिवशी माझ्या मनाची अवस्था फार विचित्र झाली होती. तेव्हा मला काही ओळी सुचल्या.
१. निर्गुणाच्या शोधापायी सगुणाची संगत सुटली ।
जळातच तडफडे ही आध्यात्मिक मासोळी ।
जगणे कठीण जाहले, जरी अंतरी नामाच्या ओळी ।। १ ।।
रज-तम कधीच सरले, सत्त्वाची साथ सुटत चालली ।
निर्गुणाच्या शोधापायी सगुणाची संगत सुटली ।। २ ।।
‘न रहे घरका, न रहे घाटका’, अशी मनाची झाली काहिली ।
काय करू रे श्रीकृष्णा, अशी पंचाईत सारी जाहली ।। ३ ।।
२. ३०.३.२०२१ या दिवशीही माझ्या मनाची स्थिती काहीशी अशीच होती.
३. श्रीकृष्णाचा नामजप करतांना तो स्वतःच्या आत झिरपतांना दिसणे, नंतर तो दिसेनासा होणे, तेव्हा ‘नामजप मध्यमावाणीतून आरंभ होऊन शेवटी परावाणीतून होत आहे’, असे जाणवणे
३१.३.२०२१ या दिवशी सकाळपासून ‘मी निर्गुणात आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवत होते. माझ्या मनाची स्थिती पुष्कळच वेगळी होती. रात्री मी नेहमीप्रमाणे झोपायला गेलो; पण मला रात्रभर झोप लागली नाही. रात्री १२.३० वाजता माझा श्रीकृष्णाचा नामजप ‘मध्यमे’तून (टीप) वेगाने चालू झाला आणि तो पुष्कळ वेळ चालू होता. मी नामजप थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी तो थांबत नव्हता. पुष्कळ वेळाने मला ‘नामजप आत कुठेतरी झिरपत आहे’, असे जाणवले. तेव्हा ‘यालाच ‘पश्यंती वाणी’ म्हणत असावेत’, असे मला वाटले. पुढे नामजप आणखीनच खोल झिरपला आणि तो दिसेनासा झाला. तेव्हा ‘ही ‘परावाणी’ असावी’, असे मला वाटले. एखादा साप जसा बिळात जातांना हळूहळू दिसेनासा होतो, तसा हा नामजप मला माझ्या आत जातांना दिसून नंतर लुप्त होत होता.
टीप – वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा असे वाणीचे ४ प्रकार आहेत. आध्यात्मिक उन्नती होईल, तसा नामजप पुढच्या पुढच्या वाणीतून होतो.
४. या काळात अनेक वेळा ध्यान लागणे आणि ‘सतत ध्यानातच रहावे’, असे वाटणे
हा रात्रीचा वेळ फारच वेगाने गेला. एरव्ही रात्रीचा वेळ लवकर जात नाही. पुढे ४ – ५ दिवस मला ‘सतत ध्यानातच रहावे’, असे वाटत होते. ध्यान लावल्यावर लगेचच माझे ध्यान लागतही होते. या काळात माझे सलग एक घंटा ध्यान लागत होते.’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (८.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |