कै. मुकुंद ओझरकर यांची नाशिक येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि निधनापूर्वी त्यांच्यात जाणवलेले पालट !
नाशिक येथील सनातनचे साधक मुकुंद ओझरकर यांचे ७.५.२०२२ या दिवशी निधन झाले. त्यांचे ४.८.२०२२ या दिवशी (श्रावण शुक्ल सप्तमीला) ३ रे मासिक श्राद्ध आहे. नाशिक येथील साधकांना कै. मुकुंद ओझरकर यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहोत.
१. श्रीमती संगीता विभांडिक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. प्रेमभाव
अ. एकदा माझी आई आणि भाऊ यांचा अपघात झाला होता. श्री. मुकुंद ओझरकरकाकांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी थेट रुग्णालयात जाऊन आध्यात्मिक लाभ होण्यासाठी त्यांना सनातनची उदबत्ती नेऊन दिली आणि त्या दोघांची (आई आणि भाऊ यांची) आस्थेने विचारपूस केली.
आ. वर्ष २०२१ मध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये माझ्या आईचे निधन झाले. त्यामुळे मला एकटेपणा जाणवत होता. तेव्हा श्री. मुकुंद ओझरकरकाकांनी भ्रमणभाष करून आमची आस्थेने विचारपूस केली. ते आम्हाला ‘काही अडचण आहे का ?’, असे विचारत असत. त्यामुळे आम्हाला त्यांचा आधार वाटत असे.
१ आ. इतरांना प्रोत्साहन देणे
काका साधकांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहन द्यायचे.
१ इ. साधकांना आधार देणे
एकदा मी एका चिंतेत होते. काकांनी ते लगेच ओळखले. त्यांनी माझ्या चिंतेचे कारण जाणून घेतले आणि मला आध्यात्मिक दृष्टीकोन दिला. त्यांनी ‘श्रीगुरूंप्रती श्रद्धा कशी वाढवली पाहिजे ?’, हे सोप्या शब्दांत सांगून मला आधार दिला. त्यांचे बोलणे माझ्या अंतर्मनात गेल्यामुळे मला त्या स्थितीतून लवकर बाहेर येता आले.
१ ई. देहप्रारब्ध आनंदाने भोगणे
काकांना मधुमेहाचा तीव्र त्रास होता. त्यात त्यांच्या एका पायाला जखम झाली होती आणि ती जखम लवकर बरी होत नव्हती. त्या जखमेमुळे काकांना पुष्कळ वेदना होत होत्या, तरीही ते आनंदी होते. त्यांनी ते देहप्रारब्ध मनापासून स्वीकारले होते.
२. कै. मुकुंद ओझरकर यांच्या निधनापूर्वी साधकांना त्यांच्यात जाणवलेले पालट
२ अ. श्रीमती वंदना ओझरकर (पत्नी), नाशिक
अंतर्मुखता वाढणे : ‘काही दिवसांपासून यजमान सतत चिंतन करतांना दिसायचे. घरात कुणाशी अनावश्यक बोलत नसत. कुणी काही म्हणाले, तरी त्याला होकार देत. अलीकडे त्यांचा सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न असायचा. त्यांची अंतर्मुखता वाढली असल्याचे मला जाणवत होते.’
२ आ. श्री. प्रशांत कुलकर्णी
अनुसंधान वाढणे : ‘काकांचे श्रीगुरूंप्रती अनुसंधान वाढले होते’, असे मला वाटत होते. त्यांना भेटायला गेल्यावर आणि त्यांच्याशी बोलतांना मला चांगले वाटायचे. भेटीत ते शक्यतो साधनेविषयी बोलत.’
२ इ. श्री. रवींद्र सोनईकर
(आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), नाशिक
२ इ १. चिडचिडेपणा अल्प होणे आणि साधकांना समजून घेणे : ‘पूर्वी काकांची सेवेत काही ना काही कारणाने चिडचिड होत असे. काही दिवसांपासून काका बरेच शांत असत आणि साधकांशी प्रेमाने बोलत. त्यांचा साधकांना समजून घेण्याचा भाग वाढला होता.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.१.२०२२)