अकोला येथील सराफावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी ६ पोलीस शिपाई बडतर्फ !
साहाय्यक पोलीस निरीक्षकाची पदावनती !
अकोला – येथील सराफ व्यावसायिकावर पोलीस कोठडीत झालेल्या अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणी एकूण ६ पोलीस शिपायांना बडतर्फ केले आहे, तर दोषी साहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदावनती (डिमोशन) केली आहे. या समवेतच स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांना ३ वेतनवाढ रोखण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. जानेवारी मासात अकोला पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने सोन्याच्या चोरीच्या प्रकरणात शेगाव येथील एका सराफ व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली होती. ‘पोलीस कोठडीत आणतांना पोलिसांनी गाडीत, तसेच नंतर उलटे टांगून मारहाण केली. यानंतर अटकेत असतांना आधीच पोलीस कोठडीत असलेल्या २ आरोपींना आपल्यावर नैसर्गिक अत्याचार करण्यास अकोला पोलिसांनी भाग पाडले’, असा आरोप या व्यापार्याने केला होता. पोलिसांनी सराफाच्या पायावर उकळते पाणी ओतल्याने त्यांचा पाय गंभीररित्या भाजला होता. जामीन मिळाल्यावर या व्यापार्याने याविषयी तक्रार प्रविष्ट केली होती. एका वृत्तवाहिनीने हे प्रकरण उजेडात आणून सतत पाठपुरावा केल्याने सरकारने या प्रकरणाची चौकशी केली.
संपादकीय भूमिकापोलिसांच्या अशा वृत्तीमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास अल्प होत आहे. जनतेचे रक्षण न करता उलट त्यांचा अतोनात छळ करणार्या अशा पोलिसांना बडतर्फीसमवेत आजन्म कारावासाची शिक्षाही केली पाहिजे ! |