श्री गणेशमूर्तींची विटंबना होत असल्याने कृत्रिम हौद उभारण्यात येऊ नयेत !
जळगाव येथे समन्वय बैठकीत गणेशभक्तांची शासन-प्रशासन यांच्याकडे एकमुखाने मागणी !
जळगाव – शहरात ५ वर्षांपूर्वी पर्यावरणाच्या नावाखाली कृत्रिम हौद बांधण्यात आले होते; पण त्यामुळे गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणात विटंबना झाली. त्यामुळे ‘यंदा येथे कृत्रिम हौद उभारण्यात येऊ नयेत. आम्ही गणरायाची विटंबना सहन करणार नाही’, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन नारळे यांनी परखडपणे प्रशासनाकडे केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे प्रशासनाकडून समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षांच्या मागणीला बैठकीला उपस्थित असणार्या सर्व गणेशभक्तांनी एकमुखाने समर्थन दिले. बैठकीला भाजपचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) श्री. पंकज आशिया, मनपा आयुक्त यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सव मंडळांना अनुमती मिळण्यात येणार्या अडचणी दूर करणे; विसर्जनमार्ग, तसेच मंडळाजवळील रस्ते येथील खड्डे बुजवणे, अनेक ठिकाणी रस्त्यावरील दिव्यांच्या अभावी होणारा अंधार दूर करण्याची व्यवस्था करणे आदी अनेक अडचणी गणेशभक्तांनी प्रशासनासमोर मांडल्या. त्यांवर उपाययोजना काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. (गणेशभक्तांवर अशा अडचणी मांडण्याची वेळच का येते ? प्रशासन स्वतःहून दायित्व घेऊन ही कामे का करत नाही ? – संपादक)
उत्सवकाळात इतरांना कोणताही त्रास होणार नाही, याकडे लक्ष देण्याविषयी पोलीस अधीक्षकांनी सर्वांना सांगितले. प्रशासन आणि गणेशभक्त यांच्यातील उत्तम समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव आनंदाने साजरा करूया, तसेच जळगाव शहरातील पारंपरिक गणेशोत्सवाचे चित्रीकरण करून त्याची ‘डॉक्युमेंट्री’ सिद्ध करण्यात येईल, तसेच होतकरू मंडळांना प्रोत्साहन दिले जाईल’, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी या वेळी सांगतिले.