तैवानशी असलेल्या मैत्रीचा आम्हाला अभिमान ! – अमेरिका
तैवानवरून अमेरिका-चीन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता !
तैपेई (तैवान) – अमेरिकेतील प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी चीनला अंधारात ठेवत २ ऑगस्टच्या रात्री तैवानचा दौरा केला. ३ ऑगस्टच्या सकाळी त्यांनी तैवानच्या संसदेला भेट दिली. तेथे त्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. या वेळी पेलोसी यांना ‘ऑर्डर ऑफ प्रोपियस क्लाउड्स विथ स्पेशल ग्रँड कॉर्डन’ हा तैवानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. पेलोसी या तैवानमधील त्यांचे निर्धारित कार्यक्रम आटोपून ३ ऑगस्टच्या सायंकाळी दक्षिण कोरियाला मार्गस्थ झाल्या.
Nancy Pelosi meets Taiwan's President, Tsai Ing-wen and reiterated Washington's support to the island country and said that the US' determination to preserve Taiwan's sovereignty is "iron-clad".#NancyPelosi #Taiwan #China #UShttps://t.co/agrGYrYZMA
— Business Standard (@bsindia) August 3, 2022
तैवान संसदेला संबोधित करतांना पेलोसी म्हणाल्या, ‘‘अमेरिकेचा तैवानला सदैव पाठिंबा असेल. आम्हाला तैवानशी असलेल्या मैत्रीचा अभिमान आहे. आमच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाची तैवानला भेट म्हणजे, या देशातील लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा सन्मान होय. तैवानच्या अडीच कोटी नागरिकांसमवेतची अमेरिकेची एकता आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे; कारण जगाला निरंकुशता आणि लोकशाही यांच्यातील निवडीचा सामना करावा लागत आहे.’’
दुसरीकडे चीनने या दौर्याचा निषेध केला असून ‘अमेरिकेने आगीशी खेळणे थांबवावे’, अशी चेतावणी दिली आहे.
अप्रसन्न (नाराज) चीन काय करू शकतो ?
चीन आता तैवानवर अधिक दबाव आणण्याचा प्रयत्न करील. यासाठी चिनी लढाऊ विमाने तैवानच्या हवाई सीमेत पूर्वीपेक्षा अधिक घुसखोरी करतील, असे म्हटले जात आहे. चीन सरकार अमेरिकेला मुत्सद्दीपणे विरोध करू शकते. ते अमेरिकेतून त्यांचे राजदूत किन गँग यांना परत बोलावू शकते.
तैवानवरून तणाव का ?
चीन तैवानला ‘वन-चायना’ धोरणांतर्गत स्वतःचा भाग मानतो, तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो. ‘तैवानला चीनच्या राजकीय मागण्यांपुढे झुकण्यास भाग पाडणे आणि चीनचे नियंत्रण मान्य करायला लावणे’, हे चीनचे ध्येय आहे. अमेरिकाही ‘एक चीन धोरण’ स्वीकारते; परंतु तैवानवर चीनचे नियंत्रण तिला मान्य नाही.
चीनकडून तैवानवर आर्थिक निर्बंध !पेलोसी यांच्या भेटीमुळे अप्रसन्न झालेल्या चीनने तैवानची कोंडी करण्यासाठी त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. चीन सरकारने तैवानला नैसर्गिक वाळू निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. कोरोना महामारीनंतर तैवानसाठी नैसर्गिक वाळू ही उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनली होती. यासह १ जुलै या दिवशी चीनने तैवानमधून १०० हून अधिक अन्न पुरवठादारांच्या आयातीवरही बंदी घातली आहे. |
_____________________________
… तर अमेरिका आणि तैवान चीनवर आक्रमण करतील !अमेरिका आणि तैवान यांचे सैन्य चीनशी सामना करण्यास सिद्ध आहे, असे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांकडून सांगण्यात येत आहे. अमेरिकी नौदलाच्या ४ युद्धनौका तैवानच्या सागरी सीमेत गस्त घालत आहेत. त्यांच्याकडे अत्यंत प्रगत लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे आहेत. चीनचा हस्तक्षेप झालाच, तर अमेरिका आणि तैवान दोन्ही बाजूंनी चीनवर आक्रमण करू शकतात. दुसरीकडे चीनने कारवाईसाठी लांब पल्ल्याचे ‘रॉकेट्स’ आणि रणगाडे सज्ज ठेवल्याचे बोलले जात आहे. तैवान सामुद्रधुनीमध्ये चीनची इतर लष्करी आयुधेही आहेत. तो त्यांचा उपयोग करू शकतो. अमेरिकी सैन्य या कृत्यांवर बारीक लक्ष ठेवून आहे. |
_______________________________
संपादकीय भूमिकाया संधीचा लाभ घेऊन भारताने चीनला कूटनीतिक, तसेच भूराजकीय स्तरावर नामोहरम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला वाटते ! |