केवळ एक चूक जगाला विनाशाकडे घेऊन जाऊ शकते ! – संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस
न्यूयॉर्क (अमेरिका) – केवळ एक चूक जगाला विनाशाकडे घेऊन जाऊ शकते. संपूर्ण जगात सर्व देशांकडून सातत्याने अण्वस्त्रांची मागणी आणि क्षमता वाढवली जात आहे. हे तात्काळ रोखण्याची आवश्यकता आहे. अण्वस्त्रांची निर्मिती करणार्या आणि बाळगणार्या देशांनी आता एक पाऊल मागे हटण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी केले आहे. ‘ट्रीटी ऑन द नॉन-प्रोलिफिरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स’च्या बैठकीत ते बोलत होते.
Today, humanity is just one misunderstanding, one miscalculation away from nuclear annihilation.
The Conference of the Treaty on the Non-Proliferation of Nuclear Weapons is an opportunity to agree on the measures that will help avoid certain disaster. pic.twitter.com/Ht4mm7RFMj
— António Guterres (@antonioguterres) August 1, 2022
गुटेरेस पुढे म्हणाले की, वर्ष १९७० नंतर आतापर्यंत अनेक देशांनी अणू सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे; पण आतापर्यंत इस्रायल, उत्तर कोरिया, भारत आणि पाकिस्तान यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. या सर्वांकडे अण्वस्त्रे आहेत. वर्ष १९४५ मध्ये जपानवर अणूबाँब टाकण्यात आल्यानंतर आतापर्यंत तरी अण्वस्त्रांचे आक्रमण झालेले नाही. यासाठी आपण संघर्ष रोखण्यासाठीच्या केलेल्या प्रयत्नांचे नाही, तर आपल्या नशिबाचे आभार मानले पाहिजेत. जगाने हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर झालेल्या अणूबाँबच्या आक्रमणाची घटना कधीच विसरू नये. आपण सर्वांनी त्यातून धडा घेतला पाहिजे. सध्या अशी स्पर्धा सर्व देशांमध्ये चालू आहे आणि मैत्री संपत आहे. विश्वास संपत चालला आहे. संवाद हरपत आहे. सर्व देश कोट्यवधी रुपये प्रलयकारी शस्त्रांची निर्मिती करण्यावर खर्च करत आहेत.