देशात धार्मिक भावना भडकवल्याच्या प्रकरणी गेल्या ३ वर्षांत ४ सहस्र ७९४ जणांना अटक !

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय

नवी देहली – देशात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी वर्ष २०१८ ते २०२० या ३ वर्षांच्या कालावधीत ४ सहस्र ७९४ आरोपींना अटक करण्यात आली. यांपैकी वर्ष २०१८ मध्ये १ सहस्र ७१६ जणांना, वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ३१५ जणांना, तर वर्ष २०२० मध्ये १ सहस्र ७६३ जणांना अटक झाली, अशी माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सरकारकडून ही आकडेवारी देण्यात आली.

या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद उत्तरप्रदेशमध्ये करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ३ वर्षांत ६२८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तमिळनाडूत ६१३, केरळमध्ये ५५२ आणि आंध्रप्रदेशमध्ये ३८३ जणांना अटक करण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये या गुन्ह्यांचे प्रमाण अल्प आहे. आसाममध्ये ३५१ जणांना अटक करण्यात आली आहे, तर मणीपूरमधून २३, गोव्यात केवळ २, जम्मू-काश्मीरमध्ये ३४, तर देहलीमध्ये ३१ जणांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे लडाख, पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि चंदीगड येथे या प्रकरणी एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही.