आत्मविश्वासाचा अभाव आणि तुलना करणे या स्वभावदोषांच्या संदर्भात सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांनी सांगितलेले दृष्टीकोन !

‘वर्ष २०२१ मध्ये एका ग्रंथाच्या सेवेच्या निमित्ताने मला पू. संदीप आळशी यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथासंदर्भातील सेवा करतांना त्यांनी मला दिलेले दृष्टीकोन पुढे दिले आहेत. त्यानुसार ‘साधना करून मला परात्पर गुरु डॉक्टरांचे मन जिंकता येऊ दे’, ही परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.

पू. संदीप आळशी
कु. रूपाली कुलकर्णी

१. इतरांनी आपले कौतुक केले, तर गुरूंची कृपा आहे आणि चुका सांगितल्या, तर शिकायला मिळाले’, असा दृष्टीकोन ठेवल्यास आत्मविश्वास वाढणे

एका हितचिंतकांनी लिहून दिलेल्या लिखाणाचा ग्रंथ छापायचा होता. ते लिखाण छापण्यापूर्वी त्या हितचिंतकांना संगणकावर ते लिखाण दाखवण्याची सेवा माझ्याकडे होती. ‘त्या हितचिंतकांना आपण केलेली (सनातन संस्थेच्या पद्धतीनुसार) लिखाणाची मांडणी त्यांना आवडेल का, ते काय म्हणतील ?’, असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला पू. संदीपदादा भेटले. तेव्हा मी पू. दादांना सहज म्हणाले, ‘‘पू. दादा, माझ्यासाठी प्रार्थना करा. मला भीती वाटते.’’ त्यावर पू. संदीपदादा मला म्हणाले, ‘‘असा विचार करू नकोस. त्यामुळे आत्मविश्वास न्यून होतो. ‘त्यांनी आपल्याला चांगले म्हटले किंवा त्यांना आवडले, तर गुरूंची कृपा आहे आणि त्यांना आवडले नाही किंवा त्यांनी काही सुधारणा, त्रुटी सांगितल्या, तर त्यातून आपल्याला शिकायला मिळाले’, असा दृष्टीकोन ठेव. त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढेल.’’

२. स्वतःची तुलना इतरांशी करू नये; कारण ‘समोरच्याने किती साधना केली आहे’, हे आपल्याला ठाऊक नसते !

एका सेवेत माझ्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्यामुळे ‘माझ्यात इतरांपेक्षा पुष्कळ स्वभावदोष आहेत. मी काही करू शकत नाही’, असे विचार येऊन मला निराशा आली होते.  मी माझ्या मनाच्या स्थितीविषयी पू. दादांना काहीही सांगितले नव्हते. ते माझ्यासोबत संगणकावर एक धारिका पडताळत होते. तेव्हा मी त्यांना काहीही न सांगता त्यांना माझी स्थिती लक्षात आली. त्यांनी धारिका पडताळण्याचे थांबवून माझी चौकशी केली आणि मला समजावले. ते म्हणाले, ‘‘आपण आपली समोरच्याशी तुलना करतो. समोरच्या व्यक्तीपेक्षा माझ्यात अधिक स्वभावदोष आहेत, असे वाटते; पण ‘आपला कितवा जन्म आहे, आपली किती साधना झाली आहे ?’, हे आपल्याला ठाऊक नाही. समजा, समोरच्याने १०० जन्म साधना केली असेल आणि मी ५० जन्म साधना केली असेल, तर तो माझ्यापेक्षा साधनेत पुढेच असणार आहे; कारण अगोदरचे ९९ जन्म त्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करायची नाही. आपल्यात कितीही स्वभावदोष असले, तरी गुरूंच्या कृपेने ते जाणारच आहेत. ‘गुरुकृपेने मी सर्व स्वभावदोषांवर मात करीन’, हे वाक्य स्वयंसूचनेप्रमाणे दिवसातून किमान ३०  वेळा मनाला सांगायचे. यामुळे तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तुझे प्रयत्न सकारात्मकतेने होतील.’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२२)