हिंदु राष्ट्र हे मानव, पशू, पक्षी, वृक्ष, वेली यांसह सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांचे हित साधणारे असेल ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त विविध विषयांवर उद्बोधन सत्र
रामनाथी (गोवा) – भौतिक विकासासाठी धर्म महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने भौतिक विकासालाच खरा विकास मानला जात आहे. मनुष्यावर जेव्हा कठीण प्रसंग ओढवतो, तेव्हा मानसिक संतुलन नष्ट होते. षड्रिपूंच्या निर्मूलनाचे महत्त्व भौतिक विकासात कुठेही नाही. सीतेचे अपहरण करणार्या रावणाची लंकाही ‘स्मार्ट सिटी’ होती; परंतु तेथे रहाणारे राक्षस होते. आपल्याला रामराज्य हवे आहे. लोकांना नीतीमान बनवणारा विकास हवा आहे. धर्म हाच राष्ट्राचा प्राण आहे. प्राण नसेल, तर शरीर मृत होते. त्याप्रमाणे धर्माविना राष्ट्र मृत होय. यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भूमी आणि संस्कृती यांवर आधारित हिंदु राष्ट्राची व्याख्या सांगितली. ‘मेरुतंत्र’ या ग्रंथामध्ये सांगितलेली हिंदु धर्माची व्याख्या ही आध्यात्मिक स्तरावरील आहे. हीन अशा कनिष्ठ विचारांचा नाश करून स्वत:त गुणांची वृद्धी करणारा हिंदु होय. सत्तेचा मोह असलेले राष्ट्ररचनेचे कार्य करू शकत नाहीत. राजकारण आणि राष्ट्ररचना ही दोन्ही वेगवेगळी कार्ये आहेत. सत्त्वगुण स्वत:चा नव्हे, तर विश्वकल्याणाचा विचार करतो. आपल्या ऋषिमुनींनी अशा प्रकारे विश्वकल्याणाचा विचार केला आहे. विश्वकल्याणाचा विचार करणारे धर्म धुरंधर सत्त्वगुणी लोकच हिंदु राष्ट्राची स्थापन करू शकतात. हिंदु राष्ट्र हे मानव, पशू, पक्षी, वृक्ष, वेली यांसह सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांचे हित साधणारे असेल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राविषयीचे विचार’, या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
हिंदूंना संघटित करणे आणि भारतीय परंपरा जोपासणे यांसाठी भारत सेवाश्रम संघ प्रयत्नरत !- स्वामी संयुक्तानंद महाराज, भारत सेवाश्रम संघ, बंगाल
बंगालमधील कोलकाता येथे प्रखर देशप्रेमी संत आचार्य श्रीमद् स्वामी प्रणवानंद महाराज यांनी भारत सेवाश्रम संघाची वर्ष १६१७ मध्ये स्थापना केली. आमचा संघ निःस्वार्थ कर्मयोगी आणि मानवतेला साहाय्य करण्यासाठी समर्पित आहे. आमच्या संघाचे देशविदेशांत कार्य चालू आहे. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी गणेशोत्सव चालू केला, त्याप्रमाणे आमच्या संघाद्वारे आम्ही बंगालमध्ये गणेशोत्सव चालू करून हिंदूंना संघटित करण्याचे कार्य केले. भारत सेवाश्रम संघाच्या वतीने रामायणाचा अनुवाद करून त्याचे ग्रंथ सिद्ध केले. रामायणाच्या पारायणासाठी आंतरराष्ट्रीय परिषदही आयोजित केली. समाजात ज्यांना मुलांचा आधार नाही, अशा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम बांधले. भारत सेवाश्रम संघाच्या वतीने आमच्या आश्रमात सूर्यनमस्कार, योगासने आणि लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शिबिरे आयोजित केली जातात. मुलांना मी आश्रमाचे व्यवस्थापन शिकवले आहे. ते आश्रमाचे कामकाज सांभाळत आहेत. भारत सेवाश्रम संघ नुसते बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवतो. त्यामुळे संघाला केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘हिंदूंना संघटित करणे, संस्कृती आणि भाषा यांचे संवर्धन करणे, तसेच भारतीय परंपरा जोपासणे यांसाठी संघ प्रयत्न करत आहे. हिंदुत्वासाठी आमचा आश्रम आहे. संत आचार्य श्रीमद् स्वामी प्रणवानंद महाराज आशीर्वादामुळे बंगालमधील हिंदू जागृत होत आहेत. बंगालमधील सरकार हिंदूंचे शोषण करत आहेत; मात्र हिंदु संघटित होत असल्यामुळे हे शोषण लवकर संपेल.
ग्रामरक्षादल स्थापन करून राष्ट्र आणि धर्म रक्षणाची भावना युवकांमध्ये निर्माण करणे आवश्यक !- प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सध्या हिंदूंना अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. शिवरायांनी मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे रणनीती निश्चित करून हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करायला हवे. यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षादल स्थापन करून युवक-युवती यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. गावातील सर्व युवक-युवती यांना स्वरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे. गावावर कोणते संकट आल्यास ग्रामरक्षादल स्वत:सह गावाचे रक्षण करेल. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येते. मंदिरे ही हिंदूंची शक्तीस्थाने आहेत. ‘धर्मांध हे प्रथम मंदिरांवर आक्रमण करतात’, हे लक्षात घेऊन मंदिरांच्या रक्षणाचे नियोजनही ग्रामरक्षादलाने करायला हवे. ‘मी हिंदु आहे आणि राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे’, ही भावना युवकांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. यातून हिंदूंचेही संघटन वाढेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. ‘ग्रामरक्षादलाच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर श्री. जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच युवकांचे ‘करिअर’ (भवितव्य) असायला हवे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
सद्य:स्थितीत युवक-युवती स्वत:च्या ‘करिअर’च्या (भवितव्याच्या) मागे लागले आहेत; परंतु आज राष्ट्राचे ‘करिअर’ धोक्यात आहे. राष्ट्राचे ‘करिअर’ धोक्यात असेल, तर आपले ‘करिअर’ कसे घडेल ? छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बालवयात राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी जीवन समर्पित केले. त्यांना स्वत:चे ‘करिअर’ नव्हते का ? त्यांचा आदर्श घेऊन ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच युवकांचे ‘करिअर’ असायला हवे. हिंदूंना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे हिंदूंची दु:स्थिती झाली आहे. समितीच्या वतीने युवक-युवती यांना विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण देण्यात येत आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथे ९५ स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात येत आहेत. शौर्याला शक्तीचे बळ मिळावे, यासाठी समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘बलोपासना सप्ताह’ आयोजित करण्यात आले. यामध्ये ५८० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले होते. काळानुसार घराघरांत हिंदु राष्ट्राचा विचार पोचवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी दिली. ‘शौर्यजागृती उपक्रमाच्या माध्यमातून युवकांचे संघटन होण्यासाठीचे प्रयत्न’ या विषयावर ते बोलत होते.