सामाजिक माध्यमांच्या अतीवापरामुळे ‘फोमो’ (फियर ऑफ मिसिंग आऊट) हा आजार बळावतो !
पुणे – सध्या अनेक जण फेसबूक, इंस्टाग्राम, लिंकडीन यांसारख्या सामाजिक माध्यमांवर सक्रीय असतात; पण याच्या अतीवापरामुळे अनेकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. त्यातून ‘फोमो’ (फियर ऑफ मिसिंग आऊट) हा आजार बळावतो आहे. या आजारात आपण इतरांपेक्षा मागे पडत असल्याची भावना आणि भीती निर्माण होते. सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांचा अतीवापर, ‘लाईक’, ‘कमेंट’ इत्यादींचा पाठपुरावा करणे, दैनंदिन जीवनातील घडामोडींवर त्याचा परिणाम होणे, ही या आजाराची काही लक्षणे आहेत. ‘सोशल मीडिया’ वापरणार्यांमध्ये ‘फोमो’ आजाराचे प्रमाण ७० टक्के पर्यंत पोचल्याचे काही तज्ञांचे मत आहे. चिंता, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, एकटेपणा, गर्दीची भीती, न्यूनगंड, असमाधानी वृत्ती, आपल्याजवळ इतरांपेक्षा अल्प असल्याची जाणीव होणे यांमुळे या आजाराचे रूपांतर रुग्णांमध्ये होते.
आपल्या बलस्थानांची, मर्यादांची जाणीव होऊन त्या समजून घेऊन स्वीकारल्यास ‘फोमो’वर मात करता येते, असे समुपदेशक डॉ. शिल्पा तांबे यांनी सांगितले. प्रसिद्धी माध्यमांपासून दूर रहाणे आणि दैनंदिन जीवनात समाधानी रहाणे याने या आजारावर मात करता येते, असे मानसोपचारतज्ञ श्रुती सोमण यांनी सांगितले.