अफगाणिस्तानला विकासकामांसाठी भारताच्या साहाय्याची नितांत आवश्यकता ! – तालिबानचा गृहमंत्री हक्कानी
शेजारील देशांना त्रास न देण्याचे तालिबानचे आश्वासन !
काबूल – संकटात सापडलेल्या अफगाणिस्तानला विकासकामे पुन्हा चालू करण्यासाठी भारताच्या साहाय्याची नितांत आवश्यकता आहे, असे वक्तव्य तालिबानचा गृहमंत्री तथा ‘हक्कानी नेटवर्क’चा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी याने येथे केले. ‘शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणासाठी आम्हाला भारताच्या साहाय्याची आवश्यकता आहे. अफगाणिस्तानातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करता यावेत, यासाठी आम्हाला भारताचा आधार हवा आहे’, असे त्याने पुढे म्हटले. काबूलमधील भारतीय दूतावास पुन्हा चालू करण्याच्या भारताच्या निर्णयाचे हक्कानी याने स्वागत केले आहे.
Afghanistan Needs India’s Help to Secure Peace: Taliban Interior Minister Haqqani https://t.co/5zu75JrWfk
— News of The World (@WORLDN3WS) August 2, 2022
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर भारताची मुख्य चिंता होती की, तेथे तालिबानच्या साहाय्याने अल्-कायदा आणि लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटना भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात; परंतु आता गृहमंत्री हक्कानी याने ‘तालिबान सरकार शेजारी देशांना, तसेच संपूर्ण जगाला आश्वासन देते की, आम्ही कुठल्याही देशाविरुद्ध कुरघोडी करणार नाही.’’
संपादकीय भूमिकाअफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्याने ‘आम्ही भारतियांना मारणार नाही’, असे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात तालिबानने अनेक भारतियांना ठार मारले होते. त्यामुळे अशा विश्वासघातकी तालिबानला साहाय्य करणे, हा आत्मघातच ठरेल ! |