दासबोध अभ्यास मंडळा’चे शाम साखरे यांच्या ८५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘चालविसी हाती धरोनिया’, या जीवनगौरव अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !
मिरज – येथील ‘श्री दासबोध अभ्यास मंडळा’चे श्री. शाम साखरे यांच्या ८५ व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘चालविसी हाती धरोनिया’, या जीवनगौरव अंकाचा प्रकाशन सोहळा ३१ जुलै या दिवशी दत्त मंगल कार्यालय, ब्राह्मणपुरी येथे पार पडला. या प्रसंगी सज्जनगड येथील ‘समर्थ सेवा मंडळा’चे कार्यवाह पू. योगेशबुवा रामदासी, चिमड संप्रदायातील कीर्तनकार पू. दीपक महाराज केळकर, सौ. सुमन शाम साखरे, सनातन संस्थेचे साधक आणि या अंकाचे संपादन करणारे श्री. किरण कुलकर्णी उपस्थित होते.
वेदमूर्ती श्री. कुश आठवले यांच्या वेदमंत्रपठणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. श्री. संजय सूर्यवंशी आणि परिवाराच्या वतीने साखरेकाकांच्या जीवनपटावर आधारित ‘व्हिडिओ’चे सादरीकरण करण्यात आले. सोहळ्याचे सूत्रसंचालन काकांची मुलगी सौ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले.
या प्रसंगी पू. योगेशबुवा रामदासी म्हणाले, ‘‘इदं न मम ।’, असे म्हणत सतत कार्यरत असणारे श्री. शाम साखरे यांनी दासबोध आणि मारुति उपासनेच्या प्रसाराची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांनी चालू केलेले अनेक उपक्रम आणि श्री मारुति उपासना गेली वर्षानुवर्षे अन् आजही चालू आहे. दिशाहीन झालेल्या समाजाला आज खर्या अर्थाने समर्थ विचारांची, संत विचारांची आवश्यकता आहे. हे विचार समाजापर्यंत निरपेक्षपणे पोचवणार्यांची खर्या अर्थाने आवश्यकता आहे.’’
या प्रसंगी ज्येष्ठ समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ, सर्वश्री अनंत बोधे, अविनाश हळबे, जगन्नाथ वेलणकर, अश्विनी कुमार कुलकर्णी, शेखर कोडोलीकर, अनुराधा मोडक, अपर्णाताई अभ्यंकर, नृसिंहवाडी येथील दत्तभक्त श्री. आप्पा कुलकर्णी, पू. गुरुनाथ कोटणीस महाराज उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. प्रारंभी भारतमाता आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले, तसेच निरांजनाने दीपप्रज्वलन करण्यात आले.
२. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
साधकत्व असणारे आणि भगवंताचे निस्सीम भक्त झालेले मिरज येथील श्री. शाम साखरे !
विविध अंगी आणि अष्टपैलू कार्य करून कर्तेपणाचा लवलेशही नसलेले अन् मुळातच साधकत्व असलेले श्री. साखरेकाका हे खर्या अर्थाने भगवंताचे निस्सीम भक्त झाले आहेत, हेच त्यांच्या जीवनाचे सार म्हणावे लागेल. ‘सामर्थ्य आहे चळवळींचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अनुष्ठान हवे’, या दासबोधातील उक्तीनुसार भगवंताचे अधिष्ठान ठेवून सतत कार्यरत असणारे श्री. साखरेकाका हे खरे आनंदयात्री आहेत.
दासबोध अभ्यास मंडळ, सनातन संस्था आणि श्री. शाम साखरे यांचा एकमेकांशी असलेला ऋणानुबंध‘श्री दासबोध अभ्यास मंडळा’च्या मिरज येथील अभ्यासवर्गाला वर्ष २००४ मध्ये सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी उपस्थित राहून सर्वांनाच आशीर्वाद दिले. या प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘अभ्यासवर्गाला येणार्या प्रत्येकाने वही आणि लेखणी आणली पाहिजे. जे शिकायले मिळते, ते लिहून घेतले पाहिजे’, असे सांगितले. त्यानंतर दासबोध अभ्यासवर्गात प्रत्येक साधक लेखणी आणि वही घेऊन येऊ लागला. श्री. साखरे यांनी मिरज परिसरात आयोजित केलेले जप अनुष्ठान आणि दासबोध अभ्यासक्रम, तसेच संस्कारवर्ग उपक्रमात सनातनच्या साधकांना नेहमीच सहभागी करून घेतले. श्री. शाम साखरे सध्या नामजप आणि भक्ती करण्याकडेच अधिक भर देतात. कोणतीही सेवा निरपेक्षतेने केल्यास आपोआप त्याचे फळ मिळते, अशीच त्यांची श्रद्धा आहे. अभ्यासातून श्रद्धा वाढते. श्रद्धा ही कधीच अंधश्रद्धा असू शकत नाही, तर ‘श्रद्धा ही श्रद्धाच असते आणि ती वाढत जाते,’ असाच संदेश त्यांनी पुढच्या पिढीला दिला आहे ! – श्री. गिरीश पुजारी, मिरज |