‘लुम्पी’ या संसर्गजन्य रोगामुळे ३ सहस्रांहून अधिक गायींचा मृत्यू !

राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील धक्कादायक घटना

जयपूर / कर्णावती – राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये ‘लुम्पी’ या संसर्गजन्य रोगामुळे आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. जवळजवळ २७ जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रसार झाला आहे. एकट्या राजस्थानमध्ये २ सहस्र १०० हून अधिक गायी या रोगाच्या बळी ठरल्या आहेत. या रोगामुळे जनावरांना त्वचेचा संसर्ग होतो. या रोगावर उपचार होत नसल्याने किंवा कोणतीही लस उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

राजस्थानचे अधिकारी सांगतात, ‘‘लुम्पी’ नावाचा संसर्गजन्य रोग एप्रिल २०२२ मध्ये पाकिस्तानमार्गे भारतात आला आहे.’’ गुजरात राज्य सरकारने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वेक्षण, उपचार आणि लसीकरणाची गती वाढवली असून पशू मेळावे घेण्यावरही बंदी घातली आहे. संरक्षणासाठी ५ लाख ७४ सहस्र जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. राजकोट जिल्हा प्रशासनाने २१ ऑगस्टपर्यंत गुरांच्या वाहतुकीवर, तसेच मृत गुरे उघड्यावर टाकण्यासही बंदी घातली आहे.

संपादकीय भूमिका

आधीच भारतात गायींची संख्या दिवसेंदिवस अल्प होत असतांना संसर्गजन्य व्याधीतून सहस्रावधी गायींचा मृत्यू होणे दुर्दैवी ! केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहून गायींचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने पावले उचलावीत !