पू. भगवंत मेनराय यांच्या खोलीत कुंडीत लावलेल्या तुळशीच्या रोपाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !
‘आपल्याला तुळशीची रोपे अनेक ठिकाणी आढळतात. या रोपांकडे पाहिल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते; कारण तुळशीच्या रोपातून सतत प्राणवायू आणि विष्णुतत्त्वमय चैतन्याच्या लहरी प्रक्षेपित होत असतात. अशाच प्रकारे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाणारे संत पू. भगवंतकुमार मेनराय यांच्या रहात्या खोलीत एका कुंडीमध्ये तुळशीचे रोप लावलेले आहे. या रोपाकडे पाहिल्यावर हे रोप पुष्कळ बहरलेले दिसते. त्याच्याकडे पाहून आनंदही जाणवतो; परंतु या रोपाची सर्व पाने खालच्या दिशेने झुकलेली दिसतात. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. तुळशीचे सर्वसामान्य रोप आणि पू. मेनरायकाका यांच्या खोलीतील रोप यांच्यातील भेद
सर्वसामान्य तुळशीच्या रोपामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता ५ ते १० टक्के असते. पू. मेनरायकाका यांच्यातील भावामुळे त्यांच्या खोलीतील तुळशीच्या रोपामध्ये ही क्षमता २० ते २५ टक्के इतकी आहे.
२. पू. मेनरायकाका यांच्या खोलीतील तुळशीच्या रोपामध्ये सूक्ष्मातून ‘वृंदवृंद’ नावाच्या ऋषींचा वास असणे
या तुळशीच्या रोपामध्ये ‘वृंदवृंद’ नावाच्या ऋषींचे सूक्ष्म रूप वास करते. ते तुळशीच्या रोपामध्ये राहून कलियुगात ध्यानमार्गाने श्रीविष्णूला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्यामुळे या रोपाकडे पाहिल्यावर आपलेही ध्यान लागते आणि त्यातून दिव्य प्रकाश बाहेर पडत असल्याचे जाणवते.
३. परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यदायी वास्तव्यामुळे पू. मेनरायकाकांच्या खोलीतील तुळशीच्या रोपामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य कार्यरत झालेले असणे
पू. मेनरायकाका यांच्या खोलीच्या बरोबर खाली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आहे. परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यदायी वास्तव्यामुळे पू. मेनरायकाकांच्या खोलीतील तुळशीच्या रोपामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य कार्यरत झालेले आहे. त्यामुळे या रोपातून चैतन्याचा सोनेरी प्रकाश वातावरणात प्रक्षेपित होऊन वातावरणाची शुद्धी होत आहे.
४. तुळशीची पाने खालच्या दिशेने झुकण्यामागील कार्यकारणभाव
४ अ. भक्तीयोगानुसार कार्यकारणभाव : पू. मेनरायकाकांच्या मनात विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या प्रती निस्सीम शरणागतभाव आहे. याच भावाचे बिंब तुळशीच्या रोपावर पडल्यामुळे या दैवी रोपातील तुळशीदेवीच्या अंशामध्येही श्रीविष्णुप्रती निस्सीम शरणागतभाव जागृत झालेला आहे. त्यामुळे या रोपाच्या पानांवर शरणागतभावाचे बिंब पडून त्याची पाने प्रतिसादरूपी प्रतिबिंबाप्रमाणे झुकलेल्या स्थितीत आहेत. यावरून ‘संतांमधील गुरु किंवा भगवंत यांच्या प्रती असणार्या भावाचा परिणाम त्यांच्या संपर्कातील वनस्पतींवरही कशा प्रकारे होतो’, हे सूत्र शिकायला मिळाले.
४ आ. ज्ञानयोगानुसार कार्यकारणभाव : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात निर्गुण-सगुण स्तरावरील अवतारी चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. पू. मेनरायकाका यांच्या खोलीतील तुळशीच्या रोपाला हे चैतन्य सहन न झाल्यामुळे या रोपाची पाने चैतन्याने युक्त असूनही ती स्थुलातून खालच्या दिशेने झुकलेली आहेत.
४ इ. ध्यानयोगानुसार कार्यकारणभाव : तुळशीच्या रोपामध्ये वृंदवृंद नावाचे ऋषी सूक्ष्मातून वास करतात. जेव्हा त्यांचे ध्यान उर्ध्वगामी लागलेले असते, तेव्हा त्याचा परिणाम तुळशीच्या रोपावर झाल्यामुळे हे रोप स्थुलातून पुष्कळ बहरलेले आहे. हे ऋषि निर्विकल्प समाधीअवस्थेत असतांना त्यांची कुंडलिनीशक्ती कधी सहस्राराकडे, तर कधी मूलाधाराकडे प्रवाहित होते. जेव्हा हे ऋषी व्यष्टी साधना करतात, तेव्हा त्यांच्या कुंडलिनी शक्तीचा प्रवाह मूलाधाराकडून सहस्राराकडे जातो. सध्या ते पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी तुळशीच्या रोपामध्ये ध्यानधारणा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या साधनेचा प्रवास समष्टीकडे चालू आहे. अशा वेळी त्यांनी लावलेल्या निर्विकल्प समाधीचा परिणाम त्यांच्या कुंडलिनीशक्तीवर होऊन ती सहस्रारातून मूलाधाराकडे प्रवाहित होत आहे. याचा परिणाम तुळशीच्या रोपावर होऊन तिची पाने खालच्या दिशेने झुकलेली आहेत.
कृतज्ञता
श्री गुरूंच्या कृपेमुळे पू. मेनरायकाकांच्या खोलीतील तुळशीच्या रोपाची पाने खालच्या दिशेने झुकण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव उमजला आणि ‘संतांच्या साधनेचा प्रभाव त्यांच्या सभोवतालच्या वनस्पतींवरही कशा प्रकारे होतो’, हे अनुभवण्यास मिळाले. ‘श्री गुरूंनी तुळशीच्या रोपाच्या माध्यमातून मला अध्यात्मशास्त्रातील नवीन पैलू शिकवले’, यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०२२)
|