राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृती समिती स्थापन करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी
हिंदु जनजागृती समितीची उत्तरप्रदेशमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ चळवळ
वाराणसी (उत्तरप्रदेश) – यावर्षी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला संपूर्ण भारतात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचेही निर्देश सरकारने देणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी उद्बोधन करणारी कृती समिती स्थापन करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्थानिक शहर दंडाधिकारी सुरेंद्र माधव सिंह, विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल आणि अप्पर पोलीस आयुक्त (मुख्यालय आणि गुन्हे) संतोषकुमार सिंह यांना देण्यात आले. या प्रसंगी अधिवक्ता विनयकुमार जयस्वाल, अधिवक्ता दीप दर्शन, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अरुण मौर्या, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन केसरी, प्रेमप्रकाश कुमार, विवेक राय आदी उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. अप्पर पोलीस आयुक्त (मुख्यालय आणि गुन्हे) संतोषकुमार सिंह यांनी ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेले प्रयत्न स्पृहणीय आहे’, असे सांगितले.
२. विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल यांनी निवेदन वाचल्यावर ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सर्व जिल्हाधिकार्यांना योग्य ते निर्देश देतो’, असे म्हणाले.
मथुरा येथे शहर दंडाधिकार्यांना निवेदन
मथुरा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शहर दंडाधिकार्यांना २७ जुलै २०२२ या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.
मथुरा येथील विविध महाविद्यालयांना निवेदन सादर
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील एस्.के.एस्. आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.के. पराशर यांना २६ जुलै २०२२ या दिवशी निवेदन देण्यात आले. अशाच प्रकारचे निवेदन ‘अमरनाथ गर्ल्स डिग्री महाविद्यालय’ आणि ‘राधा माधव इंटर महाविद्यालय’ येथेही
२५ जुलै २०२२ या दिवशी देण्यात आले.