जिभेचे चोचले ?
सध्या अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ मागवल्या जातात. त्यातीलच ‘खाद्यपदार्थ’ हे सूत्र सर्वांच्या जवळीकीचे आहे. त्यामुळे अल्पाहार आणि जेवण ऑनलाईन पद्धतीने मागवणे किंवा जवळच्या उपाहारगृहातून ते घेऊन येण्याचे प्रमाण दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. यामुळे ‘उपाहारगृहांचे स्वयंपाकी व्यस्त आणि घरचे स्वयंपाकी सुस्त’, असे समीकरण झाले आहे. अर्थात्च ही स्थिती सरसकट सर्वत्र नसली, तरी एकाचे पाहून दुसर्याकडून त्याची नक्कल केली जात आहे. जे खाद्यपदार्थ मागवले, ते खातांनाची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर ठेवून सर्वांना कळू देण्याची हौसही भागवली जात आहे.
नियमितपणे खाणारे, आठवड्यातून काही वेळा खाणारे, काही मासांनी म्हणजे वर्षातून २ – ३ वेळा खाणारे, असे ढोबळ मानाने वर्गीकरण असले, तरी वेगवेगळ्या कारणांनी नियमितपणे खाणारेही आहेत. यामध्ये शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असणे, घरचे कुणी आजारी असणे, जेवण बनवायला कंटाळा आला, अशी विविध कारणे आहेत. यामध्ये शारीरिक आणि मानसिक कारणांचे प्रमाण किती ? हे विचार करण्याचे सूत्र आहे. असे असले, तरी वरण-भात अथवा पोळी-भाजी काही मिनिटांत करता येते; पण तो सात्त्विक आहार नको असतो. ‘एकट्यासाठी कुठे आता जेवण बनवू ? घरातील मंडळी उपाहारगृहातून मागवणार आहेत, त्यात मला हवे ते मागवायला सांगतो आणि दोन घास खाऊन निवांत झोपतो’, अशी विचारधारा लक्षात येते.
या सर्वांमुळे जिभेला घरच्यापेक्षा उपाहारगृहातील जेवणाची चटक लागते. कमावणारी स्त्री असेल, तर महागाईचा विचार होत नाही; कारण जिभेचे चोचले पुरवणे आणि कष्ट नको, हे महत्त्वाचे असते. आहार हा घटक शरिराचे पोषण करण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आहार जेवढा सात्त्विक, तेवढे विचार चांगले आणि संस्कारयुक्त असतात. आहार बनवतांना तो करणार्याच्या मनाच्या स्थितीचाही खाद्यपदार्थांवर परिणाम होतो, हे प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आपण ज्या ठिकाणाहून खाद्यपदार्थ मागवतो, ते बनवणारे कोणत्या स्थितीत बनवतात, हे समजू शकत नाही, तसेच वातावरणातील वाईट शक्तींचाही त्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे अन्नग्रहण करतांना जिभेच्या चोचल्यांकडेच केवळ लक्ष न देता, त्याचा लाभ समजून घेऊन योग्य कृती करूया.
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.