आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करा !
‘सध्या वातावरणात रज-तमाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. रात्री निद्रावस्थेत असतांना हे आवरण वाढते. तसे होऊ नये; म्हणून साधकांनी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी झोपण्यापूर्वी पुढील कृती करावी.
१. प्रारंभी गुरूंना ‘श्री गुरवे नमः ।’ म्हणत वंदन करावे आणि ‘हे श्रीकृष्णा, माझ्याभोवती रात्रभर तुझ्या नामाचे संरक्षककवच असू दे. माझे सतत तुझ्याशी अनुसंधान असू दे. मला तुझ्या चरणांजवळ ठेव आणि आपत्काळात माझे संरक्षण कर’, अशी भावपूर्ण प्रार्थना करावी. त्यानंतर स्वतःभोवती पायापासून डोक्यापर्यंत सूक्ष्मातून ‘स्प्रिंग’प्रमाणे गोलाकार संरक्षककवच निर्माण करावे. त्या वेळी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, असा नामजप करतांना ‘स्वतःभोवती नामजप लिहित आहोत’, असा भाव ठेवावा.
२. त्यानंतर संरक्षककवच निर्माण झालेला आपला देह भगवान श्रीकृष्णाच्या चरणांशी ठेवावा. नंतर ‘शिवस्य हृदयं विष्णुः विष्णोश्च हृदयं शिवः ।’ म्हणजे ‘भगवान शिवाचे हृदय भगवान विष्णु आहे, तर भगवान विष्णूचे हृदय भगवान शिव आहे, म्हणजेच शिव आणि विष्णु एकमेकांपासून अभिन्न आहेत’, असे म्हणावे आणि ‘आपण शिवाच्या चरणी आहोत’, असा भाव ठेवावा.
३. त्यानंतर तिन्ही देवतांची (शिव, श्री दुर्गादेवी आणि विष्णु यांची) अस्त्रे संरक्षणार्थ आपल्या देहाच्या दशदिशांना म्हणजे अष्टदिशा आणि वर अन् खाली अशा दशदिशांना धारण करावी. यात त्रिशूळ आणि सुदर्शनचक्र यांचा उपयोग करावा. तेव्हा ‘स्वतःच्या देहाभोवती देवतांची चैतन्यमय अस्त्रे आहेत’, याची अनुभूती घ्यावी.
४. हे संरक्षककवच गुरुदेवांच्या कृपेनेच प्राप्त झाले, याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे स्मरण करावे आणि त्यांना शरण जावे. कवच निर्माण करतांना आणि दिवसभरात झालेल्या चुकांबद्दल गुरुदेवांची क्षमा मागावी आणि झोपावे.
गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) मला हे सुचवले. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६६ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०२२)
|