‘साधकांनी सतत नामजप करावा’, अशी तीव्र तळमळ असणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८४ वर्षे) !
सनातनचे ४६ वे समष्टी संत पू. भगवंत कुमार मेनराय यांचा वाढदिवस नागपंचमीला, म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमी (२.८.२०२२) या दिवशी आहे. त्या निमित्ताने पू. भगवंत कुमार मेनराय यांच्या सेवेत असतांना श्री. अजित महांगडे यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
पू. भगवंत कुमार मेनराय यांना सनातन परिवाराच्या वतीने ८४ व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पू. मेनरायकाकांचा २४ घंटे नामजप होत असणे
‘पू. भगवंत कुमार मेनरायकाका लहानपणापासूनच शिवाचे भक्त आहेत. ते इयत्ता सातवीमध्ये असल्यापासून प्रतिदिन येता-जाता शिवाचा नामजप करायचे. अनुमाने ३४ वर्षांहून अधिक कालावधीपासून (वयाच्या ५० व्या वर्षापासून) त्यांचा २४ घंटे नामजप होत आहे.
२. साधनेत येण्यापूर्वीपासून समष्टी भाव असणारे पू. मेनरायकाका !
२ अ. मंदिरात येणार्या भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी मंदिर परिसर स्वच्छ करणे : पू. काका शिवाच्या मंदिरात दर्शनाला गेल्यावर तिथे कचरा दिसल्यास ते तो स्वच्छ करायचे. एकदा ते मंदिरात गेल्यावर त्यांना पुष्कळ दुर्गंध आला. शोध घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की, मंदिराच्या परिसरात एक कुत्रा मरून पडला आहे. मंदिरातील पुजार्यांनी नगरपालिकेच्या कर्मचार्यांना कळवले होते; पण त्यांनी त्यासंदर्भात कोणतीही कृती न केल्याने मंदिरात येणार्या भक्तांना त्याचा त्रास होत होता. पू. काकांनी तो कुत्र्याचा मृतदेह काठीने ढकलून लांब नेऊन टाकला. त्यामुळे मंदिराच्या परिसरातील दुर्गंध अल्प झाला.
२ आ. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने आश्रमाची स्वच्छता करणे : घरी राहून सेवा करतांना पू. काका उत्तरदायी साधक सांगत असलेली प्रत्येक सेवा करायचे. एकदा ते एका आश्रमात गेले असतांना त्यांना ‘आश्रम परिसरातील गवत पुष्कळ वाढले आहे, आश्रमामध्ये जळमटे झाली आहेत आणि स्वयंपाकघराची खिडकी काळी झाली आहे’, असे लक्षात आले. हे सर्व पाहिल्यावर त्यांनी स्वतःहून सर्व गवत कापले, जळमटे काढली आणि खिडकीसुद्धा स्वच्छ केली. पू. काका भारतीय वायूसेनेमध्ये उच्च पदावर चाकरी करत होते, तरीही ते कोणतीही सेवा करण्याची लगेच सिद्धता दाखवायचे.
२ इ. भावनेत न अडकता समष्टी चुका सांगणे : चाकरीत असल्यापासूनच ते इतरांच्या लक्षात आलेल्या चुका स्पष्टपणे सांगत असत. आताही सेवेमध्ये आम्हा साधकांकडून होणार्या चुका ते आम्हाला लगेच सांगतात.
३. ‘साधकांचा त्रास अल्प व्हावा आणि गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) प्राणशक्ती वाढावी’, यासाठी साधकांना नामजप करायला सांगणारे पू. मेनरायकाका !
३ अ. काही वर्षांपूर्वी एका संतांनी ‘साधकांची साधना अल्प होत असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती व्यय होत आहे’, असे सांगितल्याने ‘साधकांनी अधिकाधिक नामजप करायला हवा’, असे पू. काकांना वाटणे : ‘साधकांनी अधिकाधिक नामजप करणे का आवश्यक आहे ?’, याचे कारण सांगतांना पू. काका म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी (अनुमाने २००९ मधे) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती पुष्कळ अल्प झाल्याने ते झोपूनच होते. तेव्हा एका संतांनी एका साधकाला सांगितले, ‘‘तुमच्या साधकांची साधना अल्प पडते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांची प्राणशक्ती व्यय करावी लागते. साधकांनी नामजप वाढवला, तर त्यांची प्राणशक्ती व्यय न होता वाढेल.’’
३ आ. साधकांनी नामजप वाढवल्यास त्यांचा गुरुदेवांच्या कार्यामध्ये सहभाग वाढणार असणे : नदीचे पात्र उगम स्थानाजवळ निमुळते असून नंतर त्याला अनेक ओढे येऊन मिळतात. त्यामुळे पुढे नदीचे पात्र मोठे होत जाते, तसेच आपण सर्वांनी नामजप वाढवल्यास गुरुदेवांची शक्ती व्यय होणार नाही आणि त्यांची प्राणशक्ती वाढेल, तसेच वातावरणातील चैतन्यही वाढेल. यामुळे गुरुदेवांच्या कार्यामध्ये साधकांचा सहभागही वाढेल.
३ इ. साधकांनी सतत नामजप करावा, यासाठी त्यांना पुनःपुन्हा नामजपाची आठवण करून द्यायला हवी ! : पू. काका भेटणार्या प्रत्येक साधकाला नामजप करायला सांगतात. ते म्हणतात, ‘‘एखाद्या महामार्गाच्या (हायवेच्या) कडेला वेगमर्यादा ६० (स्पीड लिमिट ६०) असा फलक पुनःपुन्हा लावलेला असतो. वाहन चालवणारा कधी इतर कोणत्या विचारांमध्ये असतो आणि ही गोष्ट त्याच्या लक्षात रहात नाही; म्हणून हे फलक परत परत लावलेले असतात. त्याचप्रमाणे आपणही साधकांना पुनःपुन्हा नामजपाची आठवण करून द्यायला पाहिजे. साधक सतत नामजप करत राहिले, तर वाईट शक्तींना त्यांना त्रास देता येणार नाही.’’
– श्री. अजित महांगडे, ढवळी, फोंडा, गोवा. (२९.७.२०२२)
|