खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ची कोठडी
पत्राचाळ आर्थिक अपहार प्रकरण
मुंबई – गोरेगाव येथील पत्राचाळ आर्थिक अपहाराच्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या ‘ईडी’च्या विशेष न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. ‘पत्राचाळ आर्थिक अपहाराचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच होते’, असा आरोप करत अंमलबजावणी संचालनालयाने संजय राऊत यांच्यासाठी ८ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
न्यायालयात संजय राऊत यांची बाजू मांडणारे अधिवक्ता अशोक मृंदरगी म्हणाले, ‘‘संजय राऊत यांची अटक राजकीय हेतूने आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रवीण राऊत याला अटक करून अनेक मास झाले असतांना इतके दिवस कारवाई का करण्यात आली नाही ? वर्षा राऊत यांना मिळालेले पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अपहारातून पैसे आले असते, तर अधिकोषाने ते घेतले नसते. त्यांनी घर आणि भूमी खरेदीसाठी दिलेले पैसे कायदेशीर मार्गाने कमावलेले होते. संजय राऊत अन्वेषणाला साहाय्य करत नसल्याचा आरोप खोटा आहे. चौकशीला बोलावले, तेव्हा त्यांनी सहकार्य केले. संजय राऊत यांच्याकडे आलेला सर्व पैसा वैध मार्गाने आला आहे.’’
संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी..
मुंबई, दि. १ ऑगस्ट:
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. #ईडी #उद्धवठाकरे #खासदारhttps://t.co/kgo7Eoe4uj pic.twitter.com/cIuoswFGfL
— xtralargenews (@xtralargenews) August 1, 2022
अंमलबजावणी संचालनालयाचे अधिवक्ता हितेन वेणेगावकर न्यायालयात बाजू मांडतांना म्हणाले, ‘‘पत्राचाळ आर्थिक अपहारात संजय राऊत यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत केवळ नामधारी होते. प्रत्यक्षात सगळे व्यवहार संजय राऊत यांनीच केले. संजय राऊत यांनी साक्षीदारांना धमकावले आहे. त्यांना सोडले, तर ते अशाच प्रकारची कृत्ये करू शकतात.’’
उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या आईची भेट !
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या आईला धीर देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडुप येथील संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली. या वेळी ठाकरे यांच्या समवेत खासदार अरविंद सावंत, आमदार रवींद्र वायकर आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या प्रसंगी शिवसैनिकांनी राऊत यांच्या घराबाहेर गर्दी केली होती.
मुंबईमध्ये पोलीस पहार्यात वाढ !
संजय राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस पहारा वाढवण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाच्या बाहेर १०० हून अधिक पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. जे.जे. रुग्णालय आणि मुंबई सत्र न्यायालय येथेही पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. या ठिकाणी पहार्यासाठी शीघ्र कृती दलाचे सैनिकही ठेवण्यात आले आहेत.
खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडून संसदेत स्थगन प्रस्तावाची नोटीस !
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी १ ऑगस्ट या दिवशी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली. केंद्रीय यंत्रणा सूडबुद्धीने कारवाई करत आहेत. संसदेचे अधिवेशन चालू असतांना राऊत यांना झालेली अटक अवैध असल्याचे चतुर्वेदी यांनी स्थगन प्रस्तावाच्या नोटिसीत म्हटले आहे.
अन्वेषण यंत्रणा पुराव्यांच्या आधारे कारवाई करतात ! – देवेंद्र फडणवीस
कोणतीही यंत्रणा पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. संजय राऊत यांच्या अटकेविषयी न्यायालय निर्णय देईल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राहिलेली नाही’, असे म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, हीच खरी शिवसेना आहे. त्यांच्या वक्तव्याचा अपसमज करू नका, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली.