जगभरातील तापमानात वाढ आणि त्याचे परिणाम !
सध्या जगभरातील बहुतांश शहरांच्या पार्याने चाळीशी पार केली आहे. वाढत्या हरितवायू उत्सर्जनामुळे जगभरातच तापमान वाढले आहे. ‘नासा’ने (‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ने) काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अवकाशातून घेतलेल्या पृथ्वीच्या छायाचित्रांमध्येही पुष्कळ मोठा पालट दिसत आहे. अलीकडे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये या वसुंधरेचा रंग अतीउष्णतेने लाल झालेला दिसत आहे. या संदर्भात पर्यावरणतज्ञ वेळोवेळी चिंता व्यक्त करत चेतावणी देत आहेत; तरीही ‘जगभरातील देश पृथ्वीच्या तापमान वाढीकडे अपेक्षित लक्ष देत आहेत’, असे दिसत नाही. शास्त्रज्ञांच्या मते या दशकामध्ये पृथ्वीवरील तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या जातील, त्यांचे परिणाम या शतकाच्या शेवटी मिळतील.
भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्येही मागील काही वर्षांपासून तापमान वाढीने मर्यादा ओलांडायला आरंभ केला आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये मे मध्ये विदर्भाचा पारा चाळीशीच्या पुढे जात होता; पण या वर्षी एप्रिल मध्येच मुंबई-ठाण्यासारख्या ठिकाणी पार्याने चाळीशी पार केली होती. काही ठिकाणी तर तो पन्नाशीकडे झुकू लागला होता.
१. उष्णतेमुळे जगभरात झालेली हानी !
युरोप-अमेरिकेमध्ये आता उष्णतेच्या तीव्र झळांनी लोकांच्या अंगाची काहिली झाली आहे. काही ठिकाणी उष्माघाताने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आज युरोप, चीन आणि अमेरिका येथेही पारा चाळीशीच्या पुढे चालला असून तेथील थंड तापमानाची सवय असलेल्या लोकांना एवढी उष्णता सहन करणे आवाक्याबाहेरचे आहे. लोकांना बाहेर पडणे अवघड होत असून ब्रिटनने तर अतीउष्णतेमुळे देशांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. त्यातच अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, फ्रान्स, चीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगलांमध्ये आगी लागल्या असून सहस्रो हेक्टर भूमी आणि जंगलसंपत्ती जळून राख झाली आहे, तसेच पशूपक्षी अन् जंगली प्राणी यांचे पुष्कळ मोठ्या प्रमाणावर शिरकाण होत आहे.
२. ‘तापमान वाढीनंतर थंडाव्यासाठी ऊर्जेचा अधिक वापर’ हे दुष्टचक्र !
तापमान वाढीने मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे उष्णता वाढली की, थंडाव्यासाठी ऊर्जेची मागणी वाढते. मग अधिक ऊर्जेसाठी पुन्हा अधिक कोळसा आणि जीवाश्म इंधन यांचा वापर केला जातो. त्यामुळे अधिक कर्ब उत्सर्जन होऊन पृथ्वीच्या तापमानात अधिक वाढ होेते. अशा दुहेरी चक्रव्यूहात सध्या पृथ्वीवरील पर्यावरण अडकले आहे. हा चक्रव्यूह भेदून सगळ्यांनाच अगदी प्रामाणिकपणे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, नाही तर यापुढे आणखी भीषण प्रसंगांना मानवाला सामोरे जावे लागेल !
३. युद्धामुळे हवामानात पालट होणे
सध्या चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामध्ये दिवसाकाठी शेकडो टन स्फोटके, विनाशकारी क्षेपणास्त्रे, तसेच दारूगोळा पुष्कळ प्रमाणावर वापरला जात आहे. ‘५ मासांनंतरही हे युद्ध थांबण्याची कुठलीच लक्षणे नसल्याने येणार्या काळामध्ये युरोपातील हवामानामध्ये मोठे असंतुलित पालट होतील’, असे तेथील तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच मध्य आशिया, चीन, रशिया यांसारख्या तेल उत्पादक देशांचा जीवाश्म इंधनाचा वापर न्यून करण्यासाठी विरोध आहे, तो वेगळाच.
४. प्रत्येक देशात पर्यावरणाचा विषय हे राजकीय सूत्र होणे आवश्यक !
सद्यःस्थितीला जगाचे कर्बवायू उत्सर्जन ४० गिगा टन (१ अब्ज टनच्या तुलनेत स्फोटक शक्तीच्या समतुल्य अणूशक्तीचे मोजमाप) आहे आणि वर्ष २०३० पर्यंत शास्त्रज्ञांना ते १८ गिगा टनापर्यंत आणायचे आहे, तरच जगाची तापमान वाढ ही १.५ अंश सेल्सियसवर रोखता येणार आहे. हे कर्बवायू उत्सर्जन शून्यावर नेण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांनी स्वतःसाठी वर्ष २०३० ते २०७० पर्यंतच्या कालमर्यादा मागील वर्षी झालेल्या ‘ग्लासगो परिषदे’मध्ये ठरवून घेतल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आंतिनियो गुटरेस यांनीही जगभरातील नेत्यांना जीवाश्म इंधनाच्या वापराविषयी चेतावणी दिली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्थानिक ते जागतिक पातळीवर असा जनमताचा रेटा लावून धरायला हवा. पर्यावरणाचा विषय हा आता प्रत्येक देशातील राजकीय सूत्र झाले पाहिजे. युरोप-अमेरिकेत या दृष्टीने आरंभ झाला आहे.
५. सध्याच्या नैसर्गिक आपत्तींना मानवाने निसर्गाची चेतावणी समजून सावध व्हावे !
मागील काही वर्षांपासून जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये सातत्याने होणारी वादळे, अल्प कालावधीमध्ये पुष्कळ जोराचा पडणारा पाऊस आणि त्यातून उद्भवणारी पूरपरिस्थिती, ध्रुवीय प्रदेशात बर्फ मोठ्या प्रमाणात वितळल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून किनारपट्टीवरील नागरिकांचे जीवन धोक्यात येणे, त्यासमवेतच जंगलांना लागणारे वणवे, दुष्काळी परिस्थिती किंवा अतीउष्णता यांमुळे शेतीपिकांची होणारी घट, वातावरणामध्ये झालेले असंतुलित पालट या मानवाला निसर्गाकडून ‘टेलिकास्ट’ (प्रसारित) होणार्या चेतावण्या आहेत. मानवजातीने सृष्टीतील या चेतावण्यांची योग्य ती नाेंद घेऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी आता मोठी चळवळ उभी रहाणे आवश्यक आहे; नाही तर येणार्या काळामध्ये
निसर्ग यापेक्षाही भयानक क्रूर होऊ शकतो; मग कुठली दयामाया न दाखवता मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवित हानी करील अन् मानवाला पुष्कळ मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल !
६. प्राणी आणि वन्य सृष्टी यांना देवत्व प्रदान करून त्यांचे पूजन करणारी भारतीय संस्कृती !
आज ‘ग्लोबल वार्मिंग’मुळे (जागतिक तापमान वाढीमुळे), जगभरातील पर्यावरणतज्ञांचे लक्ष पर्यावरणरक्षण आणि संवर्धन यांकडे लागलेले आहे; पण आमच्या ऋषींचा सृष्टीकडे बघण्याचा ‘आपल्या भोगाचे साधन किंवा उपयुक्तता’, असा भौतिक दृष्टीकोन कधीच नव्हता. आमच्या प्राचीन ऋषिमुनींनी आपल्या आजूबाजूच्या सृष्टीकडे एका दैवी दृष्टीने बघण्याचा निकोप असा दृष्टीकोन आमच्या संस्कृतीमध्ये वाढीस लावला आहे. वृक्ष, वनस्पती यांमध्येही देवत्व पहाणारी आमची संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीमध्ये, गोपूजन, नागपूजा केली जाते. हत्तीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, तर वाघाला आमच्या दुर्गादेवीने तिचे वाहन होण्याचा सन्मान प्रदान केला आहे. जगामध्ये ७० टक्के स्थान व्यापून राहिलेल्या समुद्रदेवतेची नारळी पौर्णिमेला श्रीफळ अर्पण करून पूजा केली जाते. घराघरांत तुळशीपूजन होते. संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।’ असे म्हणून निसर्गाचे गुणगान गायले आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी शेकडो एकर परिसरामध्ये वृक्षमंदिर स्थापून आजूबाजूच्या सृष्टीकडे बघण्याचा दैवी भक्तीमय दृष्टीकोन समाजाला दिला.
येणार्या काळातही संपूर्ण मानवजातीला भक्तीमय दृष्टीकोनातून प्राणी आणि वनस्पती यांच्या सृष्टीचे रक्षण अन् संवर्धन करावे लागेल, तरच या पुढील काळात सृष्टीवरील मानवी जीवन सुसह्य होईल. आगामी काळात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती येणार असल्याचे अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. वातावरणातील रज-तमाचे प्रमाण वाढणे, हेही नैसर्गिक आपत्तीचे एक महत्त्वाचे कारण आहे. हे लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्तींची संकटे सुसह्य करण्यासाठी आणि त्यातून तरून जाण्यासाठी पंचमहाभूतांना शरण जाऊन भगवंताचे भक्त बनणे आवश्यक आहे; कारण भगवंतच भक्ताचे सर्व संकटांपासून रक्षण करतो !
– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे
संपादकीय भूमिकाजागतिक तापमान वाढ आणि येणार्या नैसर्गिक आपत्ती यांच्यापासून रक्षण होण्यासाठी पंचमहाभूतांना शरण जायला हवे ! |