६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भातील गांभीर्य !
१. कु. अपालाने स्वभावदोष-निर्मूलनाची सारणी लिहून मगच झोपणे
‘४.११.२०२१ या दिवशी मी माझ्या सेवेच्या ठिकाणी जात होतो. तेव्हा रात्र झाली होती. त्याच वेळी कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) तेथे आली. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तू इतक्या उशिरा इकडे काय करत आहेस ?’’ त्यावर ती मला म्हणाली, ‘‘मी आणि कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) सेवा करत होतो. तेव्हा एका साधकाने रात्र झाल्याने आम्हाला झोपायला जायला सांगितले. त्याप्रमाणे आम्ही झोपायला गेलो. मी आज दिवसभर माझ्याकडून झालेल्या चुका सारणीत लिहिल्या नसल्याचे नंतर माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी त्या चुका लिहिण्यासाठी पुन्हा येथे आले आहे.’’ नंतर सारणी पूर्ण लिहूनच अपाला झोपायला गेली.
मला अपालातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात ‘आज्ञापालन करणे अन् गांभीर्य’, हे दोन गुण प्रकर्षाने जाणवले. या गुणांच्या आधारे ‘अपाला एक उत्तम शिष्य बनू शकेल’, असे मला वाटले.
२. साधकाने पूर्वी सारणीत चुका लिहिण्यासाठी सवलत घेणे; मात्र अपालाची वरील कृती पाहून त्याने प्रतिदिन चुका लिहायला आरंभ करणे
मला स्वतःची लाज वाटली. मी दिवसभरात माझ्याकडून होणार्या चुका सारणीत लिहिण्यासाठी नेहमी सवलत घेतो. ‘मला बर्याच सेवा असल्याने मी नेहमी व्यस्त असतो’ किंवा ‘मी सेवांमुळे पुष्कळ थकलो आहे’, अशी मी स्वतःची समजूत घालत असतो. अपालाची कृती पाहून मी आता कोणतेही कारण पुढे न करता प्रतिदिन सारणीत चुका लिहितो.
मला अपालाच्या माध्यमातून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे गांभीर्य लक्षात आणून दिल्याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. अभिषेक अण्णाप्पा पै, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२१)