उस्मानाबादच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात याचिका !
मुंबई – उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यास विरोध करणारी याचिका शेख इस्माईल मसूद शेख आणि इतर १६ जण यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे प्रविष्ट केली आहे. अधिवक्ता सतीश बी. तळेकर यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे.
याचिकेत म्हटले आहे की, वर्ष १९८८ मध्ये उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यात आले होते. हा निर्णय शासनाने वर्ष २००१ मध्ये रहित केला. त्यामुळे ‘राज्यशासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा केवळ राजकीय हेतूने घेतला आहे’, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. नामांतराचा निर्णय हा राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. त्यामुळे हा निर्णय रहित करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
२७ जुलै या दिवशी औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या विरोधात महंमद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे यांनी जनहित याचिका केली आहे. या याचिकेवरही १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे.