प्रत्येक शेतकर्याचा जीव मोलाचा असल्याने त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
संभाजीनगर – आम्ही अतीवृष्टीचा आढावा घेतला आहे. पावसामुळे मृत्यू झालेल्यांना साहाय्य करण्याविषयी आढावा घेतला. शेतपिकांची हानी झालेल्यांना हानीभरपाई देऊ. नवीन शिवसेना-भाजप युतीचे सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ. प्रत्येक शेतकर्याचा जीव मोलाचा आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. संभाजीनगर येथे पाण्याचा पुरवठा नियमित व्हावा, यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ जुलै या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. संभाजीनगर जिल्हा दौर्यावर आले असतांना ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
१. पावसाळ्यात झालेल्या हानीग्रस्तांना साहाय्य करणार असून सर्वांना पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या न होण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर नियोजन करावे लागेल.
२. वेरूळ येथील विकासासाठी निधी देणार असून मराठवाडा येथील प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली.
३. शहरी आणि ग्रामीण भागांतील रस्त्यांसाठी गुणवत्तापूर्ण कामे करणार आहोत. ६०० किलोमीटरच्या रस्त्यांचे काम चालू होणार असून यासाठी ७ सहस्र कोटी रुपये खर्च होणार आहेत.
४. आमचे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्व घटकांना आमचे सरकार साहाय्य करेल. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मोठे साहाय्य मिळणार आहे. पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिले की, निधी अल्प पडू देणार नाही. योजनांना चालना देणार असून केंद्रशासनाचा निधी योग्य वापरू. रेल्वेचे प्रश्नही सोडवण्यात येतील.
५. परभणी येथे समांतर पाण्याची योजना संमत करण्यात आली आहे. नांदेड ते जालना समृद्धी महामार्गही करायचा आहे.
६. मराठवाडा येथे खंडित झालेली मंत्रीमंडळ बैठक प्रथा पुन्हा चालू करण्याविषयी विचार केला जाईल.
७. संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेविषयी १९३ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यातील त्रुटी सुधारून प्रस्तावाला संमती देण्यात आली आहे.
८. पश्चिमी नद्यांकडून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे कसे वळवता येईल ? याचे धोरण राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असे केल्यास पावणे चार लाख हेक्टर भूमी ओलिताखाली येईल. त्यामुळे प्रत्येक वर्षी मराठवाड्यामध्ये पडणार्या दुष्काळाचा प्रश्न सुटेल.
मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, मी काहीच केले नाही. ज्याला कर नाही, त्याला डर कशाला ? ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे कुणी येत असेल, तर त्यांनी आमच्याकडे किंवा भाजपमध्ये येऊ नये. कुणीही दडपण आणि भीतीखाली पुण्याचे काम करू नका. ज्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी यापूर्वीही कारवाया केल्या आहेत, त्याही आपण पडताळून घ्याव्यात. सूडाच्या कारवाईची आवश्यकता नाही. आम्ही एकतरी सूडाची कारवाई केली का ? जे शिवसेनेतून आमच्याकडे आले, त्यातील एकाही आमदाराने ‘ईडी’ची कारवाई अथवा सूड यांच्याविषयी काहीच म्हटलेले नाही.