ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘डिसेंबर २०२१ मध्ये मला परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे एक मास रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात, म्हणजे भूवैकुंठात रहायला मिळाले. त्या वेळी ‘मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करता येऊदे’, अशी माझी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.
१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचा आढावा सत्संग !
१ अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया म्हणजे अनावश्यक विचार नष्ट करणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या आढावासत्संगात माझ्या लक्षात आले, ‘ईश्वराचे चिंतन, सेवा आणि साधना यांचे साधकत्वाला धरून सकारात्मकतेने येणारे विचार, हेच केवळ योग्य विचार असून ‘इतर सर्व विचार अनावश्यक असून ते स्वभावदोष आणि अहं यांना धरून आहेत. ते नाहीसे करणे, हीच खरी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आहे.’
१ आ. वयाने लहान असलेली मुलेही आढाव्यात सहजतेने चुका सांगतात.
२. दैवी बालके आणि युवा यांचा ‘दैवी सत्संग’ !
२ अ. भावप्रयोग घेतल्यावर दैवी बालकांची भावजागृती होणे आणि त्यांना देवाला अनुभवता येणे : ‘दैवी बालके कशी असतात ? ती कशी बोलतात ? कसा विचार करतात ?’, यांविषयी मला काहीच ठाऊक नव्हते. बालसत्संगामध्ये भावप्रयोग घेतल्यावर या दैवी बालकांची भावजागृती होते. ही मुले त्यांना करायला सांगितलेले साधनेचे सर्व प्रयत्न करतात आणि त्यांना देवाला अनुभवता येते, हे मला शिकायला मिळाले.
२ आ. गुरुदेवांची कृपा अनुभवणे : दैवी बालके ‘सर्वसामान्य मुलांना समजणार नाहीत’, असे आध्यात्मिक शब्द समजून घेऊन त्यानुसार कृती करतात. हे बघून ‘गुरुदेवांची कृपा कशी कार्य करत आहे ?’, हे मला अनुभवता आले.
२ इ. दैवी बालकांचे भावाने ओथंबलेले शब्द ऐकण्यास मन आतुर होणे : कु. वेदिका दहातोंडे (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १५ वर्षे) ही साधिका सत्संगात प्रार्थना आणि कृतज्ञता इतकी सुंदर सांगते की, त्याविषयीचे एक भावचित्र आपल्यासमोर निर्माण होते. तिचे भावांनी ओथंबलेले शब्द जीव कान देऊन ऐकतात. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ११ वर्षे) हिच्या वाणीत जिवाला ईश्वरापर्यंत नेणारा गोडवा आहे. त्यामुळे तिचे बोलणे ऐकायला मन आतुर असते.
३. ध्यानमंदिरातील छायाचित्रे आणि मूर्ती !
३ अ. ‘श्री अनंतानंद साईश माझ्या अंतरात पाहून बोलत आहेत’, असे जाणवणे : ध्यानमंदिरातील श्री अनंतानंद साईश यांच्या छायाचित्राकडे बघितल्यावर ते माझ्या अंतरात पहात असून माझ्याकडून काही चूक झाली किंवा साधनेचे प्रयत्न न्यून पडले, तर ते ‘तुझ्याकडून योग्य प्रयत्न होत नाहीत’, असे म्हणत आहेत’, असे मला जाणवायचे. त्याउलट माझी स्थिती चांगली असेल, तेव्हा मला त्यांचा तोंडवळा हसरा दिसायचा.
३ आ. प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज आणि शिष्य डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांत तोंडवळ्यावर प्रीती जाणवते.
३ इ. हनुमानाची मूर्ती : ध्यानमंदिरातील हनुमानाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर निरागस भाव जाणवतो. सभागृहातील दास हनुमानाची मूर्ती ‘एकाग्र आणि शरणागत’ भावात दिसते.
४. अन्नपूर्णाकक्षात जाणवलेली सूत्रे
अ. ‘अन्नपूर्णाकक्ष म्हणजे श्रीविष्णूचे पालनपोषण करणारे रूप आहे’, असे मला जाणवले.
आ. पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर) एकाच वेळी अनेक सेवा करतांना दिसतात. त्यांच्याकडून सर्व कृती अगदी सहजतेने होतात.
इ. इथे दयावंत गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) प्रीती अनुभवता येते. इथे ‘कोणाला काय पथ्य आहे ?’, असा सर्वांचा विचार केला जातो.
ई. इथे प्रत्येक कृती विचारून आणि वेळ वाया न घालवता केली जाते.
उ. इथे साधक वेगवेगळ्या सेवा करतात; पण प्रत्येकाचे लक्ष नामजप आणि भावपूर्ण कृती करणे यांकडे असते.
ऊ. एखाद्या साधकाच्या सेवेत पालट झाला, तर साधकाकडून तो पालट स्वीकारून लगेचच पुढची सेवा चालू होते. ‘प्रत्येक शब्द हा गुरुदेवांची आज्ञा आहे’, असा सर्वांचा भाव असल्याने कुणाचा कसलाही विरोध न होता, सर्व जण एकमेकांशी जुळवून घेत सेवा करतात.
५. रामनाथी आश्रमाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
५ अ. भावस्थिती अनुभवणे : गुरुदेवांच्या कृपेने ‘रामनाथी आश्रमात जायला मिळणार आहे’, असे कळल्यापासून ते आश्रमात पोचेपर्यंत मला भावस्थिती अनुभवता आली.
५ आ. मला वेगवेगळ्या सत्संगांचा लाभ झाला. तेव्हाही गुरुदेवांच्या कृपेमुळे माझा भाव जागृत होत होता.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा अनपेक्षितरित्या सत्संग मिळाला.
अ. त्या सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.
आ. त्या प्रत्येक कृतीचे श्रेय ईश्वराला देतात.
इ. त्या प्रत्येकाचे बोलणे मन लावून ऐकतात.
ई. त्या ‘इतरांच्या बोलण्यातून काय जाणवते ?’, याचा अभ्यास करतात.
उ. त्यांचे बोलणे सहज, सोपे आणि शांत असते.
ऊ. त्या मायेतील कोणतीही गोष्ट न बोलता सर्व साधनेविषयीच बोलतात.
७. अनुभूती
७ अ. वर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या त्यांच्या खोलीतील कपाटाकडे पाहिल्यावर आलेली अनुभूती : मी वर्ष २००८ मध्ये रामनाथी आश्रमात आले होते. तेव्हा ‘प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) पूर्वी रहात असलेल्या त्यांच्या खोलीतील कपाटाकडे बघून काय जाणवते ?’, ते बघायला सांगितले होते. तेव्हा त्या कपाटाची वरची दोन दारे उघडी होती. ‘त्यांतून आनंदाच्या लहरी वातावरणामध्ये प्रक्षेपित होत आहेत. पूर्ण कपाट ध्यानस्थ असून तळातील अर्धा फूट उंचीचा भाग पाण्याच्या लाटांप्रमाणे हलत आहे’, असे मला जाणवले होते.
७ आ. ऑक्टोबर २०२१ मध्ये रात्री जाग आल्यावर नामजप ऐकू येणे, ‘नामजप कुठून येत आहे ?’, असे देवाला विचारल्यावर रामनाथी आश्रमाचा काही भाग सूक्ष्मातून दिसणे : ऑक्टोबर २०२१ मध्ये मी ठाण्याला, म्हणजे माझ्या घरी असतांना एकदा मला पहाटे ३ वाजता जाग आली. तेव्हा मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ऐकू येत होता. मी ‘नामजप कुठून ऐकू येत आहे ?’, हे पाहिले. मी झोपतांना कधी नामजप लावून ठेवत नाही. त्यामुळे मी देवाला विचारले, ‘हा नामजप कुठे चालू आहे ?’ तेव्हा मला रामनाथी आश्रमावर लावलेला ध्वज आणि त्याच्या खालचा अर्धा आश्रम सूक्ष्मातून दिसला. पुढेही काही क्षण मी नामजप ऐकत होते.
८. ‘सर्व साधकांविषयी प्रीती वाटत आहे’, असा सूक्ष्म अहं होणे, तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वांवर प्रीती करायला शिकवल्याचा हा परिणाम आहे’, त्यामुळे सर्वच साधक सर्वांशी प्रीतीने वागत आहेत’, असे लक्षात येणे
‘सनातनचे सर्व साधक म्हणजे माझा परिवार आहे. मला या सगळ्यांविषयी आपलेपणा वाटत आहे’, असा माझ्या मनात एक सूक्ष्म अहं होता. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भेटीनंतर माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेवांनी आपल्या प्रीतीचा रंग सर्व साधकांना दिला आहे. त्यामुळे साधक सर्वांशी प्रीतीने वागत आहेत. त्यांच्या या प्रीतीमुळे आपल्याला सर्वांविषयी आपुलकी जाणवत आहे.’ अशा प्रकारे कोणताही संघर्ष न होता गुरुदेवांनीच माझा अहं काढला.
मला या अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. भक्ती गैलाड (वय ५७ वर्षे), ठाणे (६.४.२०२२)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |