केरळमधील कम्युनिस्टांचा अजब साम्यवाद !
केरळमध्ये सध्या साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाचे सरकार आहे. वर्ष १९५६ मध्ये भारतीय संघराज्यातील केरळ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि १९५७ मध्ये केरळमध्ये पहिले लोकशाही सरकार कम्युनिस्ट पक्षाचे बनले. आज राज्य निर्मितीनंतर ६५ वर्षांनंतर ‘कम्युनिस्ट’ केरळची वाटचाल कशी चालू आहे, हे सांगणारा प्रवासानुभव…
१. केरळच्या कम्युनिस्टांचे प्रेरणास्रोत कोण ?
केरळमध्ये ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा’चे राज्य आहे. नावाप्रमाणेच पक्षाची प्रेरणा ‘कार्ल मार्क्स’ हा (जर्मन अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजवादी नेते) आहे. आपल्या देशात लोकशाही आहे आणि निवडणुकांद्वारे राजकीय पक्ष सत्तेवर येतात. जगभरातील कम्युनिस्टांचा इतिहास पाहिल्यानंतर ते निवडणुकांना सामोरे जात नाहीत. ‘शेतकरी आणि कष्टकरी यांच्या रक्तरंजित उठावातून सत्तेचा मार्ग जातो’, या कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावर त्यांची श्रद्धा असते. त्यामुळे वर्ष १९५७ पर्यंत तरी जगातील एकही कम्युनिस्ट सरकार निवडणुकीतील विजयाद्वारे सत्तारूढ झाले नव्हते; परंतु केरळमध्ये त्या वर्षी मात्र तेथील पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष जिंकून सत्तेवर आला. या पक्षाचे केरळमधील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे स्थानिक नेते किंवा पक्षाचे राष्ट्रीय नेते यांच्या प्रतिमा त्यांचा प्रसारसामुग्रीत अर्थात् बॅनर्स-पोस्टर्सवर नसतात. काँग्रेस म्हटले की, त्यांच्या प्रचारसामुग्रीवर गांधींपासून राहुल गांधीपर्यंत सर्वांची छायाचित्रे उठून दिसतात. अगदी भाजपच्याही प्रचारसामुग्रीवर अटलजींपासून अमित शहापर्यंत सर्वांची छायाचित्रे असतात. या पार्श्वभूमीवर केरळमधील कम्युनिस्टांचे वेगळेपणे अधोरेखित होते. त्यांच्या प्रचारसामुग्रीवर चित्रे असतात ती जगभरातील कम्युनिस्ट क्रांती करणार्या तीन नेत्यांची ! पहिले चित्र आहे, ते अर्जेटिनातील कम्युनिस्ट क्रांतीचे युवानेते ‘चे गव्हारा’ यांच्या विविध पोस्टर्सचे ! दुसरे चित्र रंगवलेल्या भिंतीचे आहे. त्यावर ‘कार्ल मार्क्स’, ‘फेड्रिक एंगल’ आणि ‘व्लादिमिर लेनीन’ यांची एकत्रित छायाचित्रे आहेत. असे पोस्टर्स आणि अशा रंगवलेल्या भिंती कोचीन-एर्नाकुलम् नगरात सर्वत्र दिसतात अन् त्यांच्या जोडीला दिसतात, ते सर्व रस्त्यांवरील पथदीपांच्या आणि विद्युत्वाहिन्यांच्या स्तंभांवर लावलेले कम्युनिस्ट पार्टीचे विळा-हतोड्याचे चिन्ह असलेले झेंडे !
थोडक्यात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही राष्ट्रीय विज्ञापन करता येईल, असे आदर्श व्यक्तीमत्त्व कम्युनिस्ट पक्षाला नेत्याच्या रूपात मिळालेले नाही; म्हणूनच विदेशातील जर्मनी-रशिया-अजेंटिनातील नेत्यांची चित्रे लावण्यात तो आजही धन्यता मानतो. दुर्दैवाने ही अराष्ट्रीयता आहे !
२. ‘गल्फ मनी’ हा मोठा अर्थस्रोत !
भारताच्या एकूण निरुद्योगी (बेरोजगारी) दरापेक्षा केरळचा निरोद्योगी दर पुष्कळ अधिक आहे. तेथे साक्षरता १०० प्रतिशत असली, तरी उद्योगधंदे अत्यल्प आहेत; कारण एखादा उद्योग चालू झाला की, लगेचच तेथे कम्युनिस्ट पार्टीच्या नावाच्या युनियनचे झेंडे लागतात. ‘काम कमी आणि मागण्या अधिक’ अशी त्यांची गुंडशाही असते. अशा स्थितीत उद्योग उभे रहात नाहीत. त्यामुळे शिकलेल्या केरळवासियांना नोकर्या मिळत नाहीत ! बहुतांश शिकलेले केरळी लोक आखाती (गल्फ) देशांमध्ये नोकर्या स्वीकारतात. आखाती देशांमध्ये केरळी लोक प्रामुख्याने परिचारिका (नर्स), वाहनचालक (ड्रायव्हर), तंत्रज्ञ (टेक्निकल स्कील्ड लेबर) ही कामे करतात. त्यांचा विदेशी प्रवास सुलभ व्हावा यासाठी छोट्याशा केरळमध्ये ४ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. आज ३५ लाख केरळी लोक आखाती देशांत रहातात. त्यांच्यामुळे परकीय उत्पन्न केरळ राज्याला मिळते आणि तेथील अर्थव्यवस्था चालते. उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात नसूनही केरळ परकीय उत्पन्नाच्या भरवशावर या राज्याची अर्थव्यवस्था टिकून आहे. त्यात केरळच्या कम्युनिस्टांचे योगदान शून्य आहे.
३. निळ्या वस्त्रांतील हमालींची गुंडगिरी !
कोचीन-एर्नाकुलम नगरात सर्वत्र निळे वस्त्र परिधान केलेले हमाल दिसतात. या लोकांना ‘नोक्कू कुली’ म्हणतात. कुठल्याही उद्योगी वाहनातील सामान उतरवायचे असेल, तर त्यांना बोलवावे लागते. आपण स्वतःहून उतरवणार असू, तरी त्यांना त्यांचे मोल द्यावे लागते. मालकाने त्यांना पाहिले, तरी त्यांचे मूल्य ते जे मागतील, ते देण्याची ‘कम्युनिस्ट’ कुप्रथा तेथे आहे. अनेक सुशिक्षित तरुण मुलांची चौकडी निळ्या रंगाचा कुलीचा ड्रेस घालून शहरात फिरत असते आणि पैसे वसुल करत असते. कम्युनिस्ट पक्षाचे संरक्षण असल्याने कुणीही त्यांना विरोध करत नाही. कम्युनिस्टांचे राज्य कसे असते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे !
– श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.
केरळमध्ये कम्युनिस्टांची मक्तेदारी !केरळमधील बहुतांश हिंदू कम्युनिस्ट पक्षाला मत देतात. एका सामान्य घरातील हिंदु मतदाराला मी विचारले की, तुम्ही कम्युनिस्ट पक्षाला का मत देता ? त्याने सांगितले की, मृत्यूनंतर येथे खांदा द्यायला लोक नसतात. अंत्यसंस्कार कोण करणार, हा प्रश्न असतो ? अशा वेळी कोणाच्या घरी मृत्यू झाला की, स्थानिक कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातून तिरडी आणि अंत्यसंस्काराचे साहित्य येते. पक्षाचे कार्यकर्ते स्वतः खांदा देऊन स्मशानभूमीत पोहोचवतात. असे अजून कोण करते ? त्याच्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते ! केरळमधील हिंदू स्वतःला स्मशानभूमीकडे नेण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाला मत देतात, एवढे मात्र त्यांच्या बोलण्यातून कळले ! |