(म्हणे) ‘गुजराती आणि राजस्थानी यांना काढल्यास मुंबई ‘आर्थिक राजधानी’ रहाणार नाही !’
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आक्षेपार्ह विधान
मुंबई – मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते; मात्र गुजराती आणि राजस्थानी लोकांना मुंबईतून काढून टाकल्यास ‘मुंबई आर्थिक राजधानी रहाणार नाही’, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ जुलै या दिवशी अंधेरी येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचे नामकरण आणि उद्घाटन सोहळा पार पडला. या चौकाला ‘दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी’ यांचे नाव देण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. ‘मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक रहाणार नाहीत’, असेही ते या वेळी म्हणाले. राज्यपालांच्या वक्तव्यावर राज्यातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
राज्यपालांच्या विधानाशी असहमत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांच्या विधानाशी असहमत आहोत. राज्यपालांचे विधान वैयक्तिक आहे. मुंबईच्या विकासातील मराठी माणसाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलीदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान सर्वांनाच ठाऊक आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.
मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग सर्वाधिक ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वाटचालीत मराठी माणसाचे कार्य अन् श्रेय हे सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसाने प्रगती केली आहे. विविध समाजांचे योगदान आपल्याला नाकारता येणार नाही; पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी उद्योजक, मराठी साहित्यक, तसेच विविध क्षेत्रांतील मराठी लोक यांचा सहभाग हा सर्वाधिक आहे. मुंबई किंवा महाराष्ट्र यांच्या, तसेच देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग सर्वाधिक आहे.
राज्यपालांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केला आहे ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख शिवसेना
राज्यपालांनी त्यांचे वक्तव्य अनवधानाने केलेले नाही. गेल्या ३ वर्षांतील त्यांची काही वक्तव्ये पहाता ‘महाराष्ट्राच्याच नशिबी असे राज्यपाल का आले ?’, असा प्रश्न पडतो. राज्यपालांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची क्षमा मागितली पाहिजे. ‘त्यांनी गुन्हा केला आहे’, असे वाटत असेल, तर त्यांना कारागृहात पाठवा. वर्ष १९९२-९३ च्या दंगलीत मराठी माणसांनीच सर्वांचे प्राण वाचवले आहेत. त्या वेळी ‘ते कोणते भाषिक आहेत ?’, हे पाहिले नाही. त्यामुळे राज्यपालांनी समाजात फूट पाडण्याचे काम केले आहे.
राज्यपालांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे…
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे pic.twitter.com/3XtywKm0dC— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 30, 2022
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारीस्वतःवरील टीकेविषयी स्पष्टीकरण देतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणूस यांच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्यामुळे मी अतिशय अल्प कालावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा प्रयत्न केला; मात्र नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला पालटावी लागेल. एका समाजाचे कौतुक, म्हणजे दुसर्या समाजाचा अपमान कधीही नसतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी त्यावर अकारण वाद निर्माण करू नये.’’ |
मराठी माणसाला डिवचू नका ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
राज्यपालांच्या विधानाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना राज ठाकरे म्हणाले, ‘‘आपल्याला इतिहासाविषयी माहिती नसेल, तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे पद आहे. त्यामुळे आपल्याविषयी बोलतांना लोक कचरतात. आपल्या वक्तव्याने जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसाने येथील भूमी आणि मन मशागत करून ठेवल्यामुळेच इतर राज्यांतील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत. त्यांना दुसरीकडे असे वातावरण मिळेल का ? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले; म्हणून वातावरण गढूळ करू नका. मराठी माणसाला डिवचू नका.’’