उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर, नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !
सनातनच्या ग्रंथांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यातील चैतन्याचे प्रतीक !
१० जुलै २०२२ या दिवशीच्या भागात नांदेड येथे मिळालेला प्रतिसाद पाहिला. आता या भागात परभणी, मानवत, नगर, जळगाव आणि नाशिक येथे मिळालेला उत्तम प्रतिसाद पहाणार आहोत.
६. परभणी
६ अ. परभणी येथील ‘आकाशकन्या कल्पना चावला’ शाळेतील संचालिका सौ. ठाकरे यांनी सनातन संस्थेची ग्रंथसंपदा पाहून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले महान असणार !’, असे गौरवोद्गार काढणे : ‘परभणी येथील ‘आकाशकन्या कल्पना चावला’ शाळेतील संचालिका सौ. ठाकरे सनातनच्या ग्रंथसंपदेची सूची पहात असतांना त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पुष्कळ वेळ पहात होत्या. नंतर त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) मुखावर किती चैतन्य जाणवत आहे. ‘वेगवेगळ्या विषयांवरील एवढे ग्रंथ सिद्ध करणे’, हे सामान्य व्यक्तीचे कार्य नाही. ते महान असणार !’’ त्यांनी शाळेसाठी काही ग्रंथांची मागणी देऊन आम्हाला सुचवले, ‘‘आपण या ग्रंथांचे शाळेत प्रदर्शन लावूया. विद्यार्थ्यांना संस्कारविषयक ग्रंथांची माहिती सांगून पालकांकडून मागणी घेऊ आणि पैसे आणायला सांगू शकतो. त्यामुळे अनेक घरी हे ज्ञान पोचेल.’’
६ आ. मानवत
६ आ १. येथील एका मोठ्या शिक्षणसंस्थेने मोठ्या प्रमाणात ग्रंथांची मागणी देणे : येथील एका मोठ्या शिक्षणसंस्थेचे विश्वस्त श्री. कत्रुवार यांना सनातनची ग्रंथसंपदा आवडली. त्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि शाळा यांसाठी काही ग्रंथांची मागणी केली. १८ ते २० वर्षांपूर्वी त्याच संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या अध्यक्षांना सनातन संस्थेचे साधक भेटले होते. तेव्हा त्यांचा धार्मिक कार्याला तीव्र विरोध होता आणि ते सनातन संस्थेविषयी चुकीचे वाक्यही बोलले होते. त्यामुळे ‘त्याच शाळेच्या सदस्यांना कसे भेटायचे ? ते मागणी देतील का ? ते विषय समजून घेतील का ?’, असे विचार आमच्या मनात येत होते. प्रत्यक्षात ते भेटल्यावर त्यांनी मागचा कुठलाही विषय न काढता, अभियान समजून घेतले आणि ग्रंथसूची पाहिली. त्यांनी मुख्याध्यापकांना भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मानवत शाळेसाठी ग्रंथ घ्या. जे ग्रंथ निवडाल, त्याचे दोन संच घेऊन एक पाथरी गावातील शाळेसाठीही पाठवा. ग्रंथ आल्यावर धनादेशाने त्यांना सर्व रक्कम द्या.’’
६ आ २. ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ही पुढील काळाची आवश्यकता आहे’, असे सांगणारे मानवत येथील व्यापारी श्री. सुरेश काबरा ! : येथील व्यापारी श्री. सुरेश काबरा यांच्याशी झालेल्या संपर्कात त्यांनी सांगितले, ‘‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती’ ही पुढील काळाची आवश्यकता आहे. ‘नाहीतर पुढील पिढीत हिंदू रहाणार नाहीत.’’ त्यांनी त्यांच्या कुटुबियांसाठी ग्रंथांची मागणी केली. ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी विश्वस्त असलेल्या मानवत येथील एका मंदिरासाठी ग्रंथांची मागणी देतो. आणखी ४ – ५ मंदिरांतून ग्रंथांच्या मागणीचा प्रयत्न करतो.’’
६ आ ३. येथील एका शिक्षणसंस्थेच्या प्राचार्यांनी ग्रंथ पाहून महाविद्यालयासाठी ग्रंथांची मागणी देणे : येथील अजून एका शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयातील प्राचार्यांशी झालेल्या भेटीत त्यांनी सनातन संस्थेविषयी बोलतांना मडगाव स्फोट प्रकरणाचा उल्लेख केला. त्यांना ग्रंथ दाखवून अभियानाविषयी माहिती सांगितली. तेव्हा ते प्राचार्य स्वतःच म्हणाले, ‘‘मडगाव प्रकरण खोटे होते. ते सनातन संस्थेला गोवण्याचे षड्यंत्र होते.’’ त्यांनी ग्रंथांविषयी गौरवोद्गार काढून ग्रंथपालांना ग्रंथांची मागणी देण्यास सांगितले.
७. वाचनालयात ग्रंथ ठेवण्याविषयी आश्वस्त करणारे हिंगोली जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत पाटील !
एका साधकांनी मुंबई येथे हिंगोली जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत पाटील यांची भेट घेतली. त्यांनी स्वतःसाठी ग्रंथांची मागणी केली आणि त्यांनी खासदार निधीतून वाचनालयात ग्रंथ ठेवण्याविषयी आश्वस्त केले.
८. अहमदनगर
८ अ. अहमदनगर येथील शिक्षणसंस्थांमध्ये आलेले उत्साहवर्धक अनुभव !
८ अ १. ‘सप्ताहातून एक दिवस एक घंटा तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन आमच्या मुलांना मार्गदर्शन करा’, असे सांगणारे नूतन माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय मिरजगाव येथील प्राचार्य श्री. मंदीलकर ! : नूतन माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय मिरजगाव येथे गेल्यानंतर प्राचार्य श्री. मंदीलकर यांना भेटून ग्रंथ दाखवले. ग्रंथ बघितल्यानंतर ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही आमच्याकडे यायला एवढा उशीर का केलात ? आमची शाळा आता तुमची झाली आहे. ‘सप्ताहातून एक दिवस एक घंटा तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन आमच्या मुलांना मार्गदर्शन करा.’’ त्यांनी शाळेचे विविध उपक्रम आम्हाला पुष्कळ उत्साहाने दाखवले. त्यांनी ग्रंथाच्या एका संचाचे मागणीपत्र दिले. शाळेचे संचालक डॉ. चेडे यांनी आम्हाला विचारले, ‘‘तुम्ही आमच्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन करू शकता का ? आमची पुढील ग्रंथांची मागणी मोठी असेल.’’
८ अ २. कर्जत येथील एका विनाअनुदानित महाविद्यालयानेही ग्रंथांची मागणी देणे : कर्जत येथील एका विनाअनुदानित महाविद्यालयाला ग्रंथांसाठी कुठलेही अनुदान मिळत नाही. ते म्हणाले, ‘‘आमचे महाविद्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहे. आम्ही नवीन इमारतीमध्ये गेल्यावर संपूर्ण ग्रंथ संच घेऊ. तुमच्या सत्संगाची लिंक मला पाठवत जा.’’ त्या वेळी त्यांनी काही ग्रंथ घेतले. त्यांनी आम्हाला संपर्कासाठी २ नवीन शाळांची माहितीही दिले.
९. शेतकरी शिक्षणसंस्था, आष्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विधाते यांनी ‘मुख्याध्यापकांच्या मासिक बैठकीमध्ये ग्रंथाची माहिती सांगण्यास वेळ देऊ’, असे सांगणे
शेतकरी शिक्षणसंस्था, आष्टीचे (जिल्हा बीड) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विधाते यांनी सनातन संस्थेविषयी असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले आणि स्वतःसाठी काही ग्रंथ घेतले. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही मुख्याध्यापकांच्या मासिक बैठकीमध्ये या. आम्ही तुम्हाला ग्रंथांची माहिती सांगण्यासाठी वेळ देतो. आम्ही इतर कुणालाही असा वेळ देत नाही.’’
१०. जळगाव
१० अ. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भेटण्याची तीव्र तळमळ असणारे श्री. राजेश कुलकर्णी ! : येथील श्री. राजेश कुलकर्णी यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची तीव्र तळमळ आहे. ते नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात आणि त्यातील परात्पर गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र पहातात. ते दत्त उपासक आहेत. प्रतिदिन त्यांची दत्ताची पूजा झाल्यावर त्यांना प.पू. गुरुमाऊलीचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) चरण दिसतात. त्यांचे चरण दिसल्यानंतर त्यांच्या पूजेची सांगता होते. त्यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनाही भेटण्याची तीव्र तळमळ आहे. ‘कोरोना महामारीची तीव्रता न्यून झाल्यावर तुम्ही गोव्याला जाऊ शकता. तुमची भेट होईल’, असे त्यांना सांगितल्यावर त्यांचा भाव जागृत झाला. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या भावस्थितीतून बाहेर पडल्यावर ते म्हणाले, ‘‘महाभारत काळातही बर्याच जणांना ‘श्रीकृष्ण ईश्वर आहे. तो श्रीविष्णूचा अवतार आहे’, हे ठाऊक नव्हते. दुर्योधनासारखे काही जण त्याला ‘गवळ्याचा पोर’ म्हणायचे; पण नंतर ‘श्रीकृष्ण हाच ईश्वर आहे’, हे सर्वांना कळले. त्याचप्रमाणे ‘प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) अवतार आहेत’, हे लोकांना नंतर कळेल.’’ श्री. कुलकर्णी म्हणाले, ते किती सत्य आहे, हे ‘धर्मदान अभियान’ आणि ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ या दोन्ही अभियानांतून आमच्या प्रत्ययास येत आहे.
१० आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ओळखणार्या आधुनिक वैद्यांनी बीजमंत्राशी संबंधित ग्रंथात विशेष रुची दाखवणे : ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या संपर्कासाठी आम्ही एका हितचिंतक सनदी लेखापालांना (चार्टर्ड अकाउंटंट) भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी त्यांच्या संपर्कातील एका आधुनिक वैद्यांचा संपर्क क्रमांक दिला आणि त्यांना भेटण्यास सांगितले. आम्ही प्रथमच त्या आधुनिक वैद्यांना भेटायला जात होतो. आम्ही त्यांना सनातन संस्थेच्या ग्रंथसंपदेची सूची दाखवली. तेव्हा त्यावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी यांना ओळखतो. मी विद्यार्थीदशेत असतांना मुंबई येथे त्यांचे आधुनिक वैद्यांसाठी व्याख्यान (‘सेमिनार’) व्हायचे. त्याला मी गेलो होतो. त्यांचे व्यक्तीमत्त्व पुष्कळच प्रभावशाली आहे. आम्ही व्याख्यानासाठी त्यांना पुण्यालाही आमंत्रित करणार होतो.’’ हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले आणि आनंद झाला. इतकी वर्षे येथे सनातनचे कार्य चालू आहे; पण या आधुनिक वैद्यांच्या संपर्कात आम्ही कधी आलो नाही. आता ही ज्ञानशक्ती आम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन आली. त्या आधुनिक वैद्यांनी बीजमंत्राशी संबंधित ग्रंथात विशेष रुची दाखवली. ते आम्हाला म्हणाले, ‘‘हे ‘ज्ञानशक्ती अभियान’ आणखी काही जणांपर्यंत पोचवण्यासाठी मी साहाय्य करीन. आश्रमातील साधकांना वैद्यकीय साहाय्य लागल्यास मला अवश्य सांगा.’’
१० इ. सनातन संस्थेच्या ग्रंथासाठी लोकप्रतिनिधींनी जो विकास निधी उपलब्ध करून दिला, त्याला मान्यता मिळण्यास गुरुकृपेने कोणतीही अडचण न येणे : गुरुदेवांच्या कृपेने लोकप्रतिनिधींनी सनातनच्या ग्रंथांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला, त्याला मान्यता मिळण्यास काही अडचण आली नाही. जिल्ह्याचे संबंधित अधिकारी पुष्कळ सहकार्य करणारे लाभले. ‘जणू ते आमचे सहसाधक आहेत’, असेच ते आम्हाला साहाय्य करत होते. प्रत्येक टप्प्यावर, म्हणजे अगदी ‘पत्रात मजकूर कसा लिहून घ्यावा ?’, ‘संबंधित कार्यालयात कोणत्या अधिकार्यांना भेटावे ?’ इत्यादी सर्वच गोष्टींसाठी या अधिकार्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे हे क्लिष्ट वाटणारे कार्य केवळ गुरुदेवांच्या कृपेने सुरळीतपणे पार पडले. दोन आमदारांनी ग्रंथांची मागणी दिली आहे. ०
१० ई. सनातनचे ग्रंथ गावागावात पोचण्यासाठी ग्रंथ संच प्रायोजित करणारे सराफ व्यापारी : येथील सराफ व्यापार्यांना सनातन संस्थेच्या ग्रंथांविषयी सांगितले. तेव्हा सर्वप्रथम ते म्हणाले, ‘‘आम्हाला वाचन करायला वेळच नसतो. उगाच हे अनमोल ग्रंथ घेऊन पडून रहातील. त्यांना गावात असलेल्या धर्मप्रेमींसाठी गावात ‘ज्ञानशक्ती वाचनालय’ चालू करण्याची संकल्पना सांगितली. त्यांना ती पुष्कळ आवडली आणि त्यांनी त्यासाठी ५ गावांतील धर्मप्रेमींसाठी ५ ग्रंथ संच प्रायोजित केले. त्यामुळे आता ५ गावांतील धर्मप्रेमींना या ग्रंथांचा निश्चित लाभ होईल. ‘सनातनची ही ज्ञानशक्ती गावांगावांत पोचली पाहिजे’, असा त्यांचा भाव होता.
१० उ. ‘मंगळग्रह देवस्थान, अंमळनेर’ येथील विश्वस्तांनी ग्रंथांची मागणी देणे : ‘मंगळग्रह देवस्थान, अंमळनेर (जिल्हा जळगाव)’ येथील विश्वस्तांनी मंदिर आणि भक्त निवास यांसाठी अन् अन्य शाळा यांना वाटप करण्यासाठी ग्रंथांची मागणी दिली. त्यांनी स्वतःहून ‘पुढील वर्षाच्या पंचांगासाठी संपूर्ण एक पानाचे विज्ञापन देणार आहे’, असे सांगितले. त्यांनी मंदिरातील ६० सेवकांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, उदा. ‘सोशल मीडिया’, प्रथमोपचार, धर्मशिक्षण आणि साधना सत्संग यांची मागणी केली. ते मंदिर परिसरामध्ये धर्मशिक्षण फलक लावण्याचे नियोजन करणार आहेत. मंदिराचा परिसर १५ एकरचा असून संपूर्ण भारतभरातील भाविक तेथे येतात.
११. नाशिक
११ अ. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ ही पुष्कळ स्तुत्य संकल्पना आहे’, असे सांगून ग्रंथ घेणारे श्री. अजय येलमेलवार ! : श्री. अजय येलमेलवार यांना संपर्क केल्यावर ते म्हणाले, ‘‘लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी लोक मौजमजा करतात; पण त्या दिवशी आपण हे ग्रंथ शाळेत दिले, तर ते मुले आणि शिक्षक यांना लाभदायी ठरतील. प्रत्येक ग्रंथाचा विषय पुष्कळच छान आहे. ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ हा विषय मी प्रथमच पहात आहे. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ ही पुष्कळ स्तुत्य संकल्पना आहे.’’ त्यांनी बरेच लहान-मोठे ग्रंथ घेतले.
११ आ. ‘सर्वच ग्रंथ छान असून असे ग्रंथ कुठेही मिळणार नाही’, असे उद्गार काढणारे श्री. व्हि.एस्. पाटील ! : श्री. व्हि.एस्. पाटील म्हणाले, ‘‘असे ग्रंथ दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत. सर्वच ग्रंथातील माहिती पुष्कळ छान आहे. ‘किती आणि कुठले ग्रंथ घेऊ ?’, हाच मोठा प्रश्न आहे.’’ त्यांनी बरेच लघु आणि मोठे ग्रंथ घेतले.’
– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२९.१.२०२२) (समाप्त)