श्रावण मासानिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात संपूर्ण १ मास धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !
जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य यांचे मंदिरामध्ये महाअनुष्ठान
मंदिराच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती
सोलापूर, २९ जुलै (वार्ता.) – ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यनगरीमध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी, श्री ब्रह्नमठ होटगी मठ संस्थान आणि भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर मंदिर येथे श्रावणमास उत्सव समितीच्या माध्यमातून २९ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमांसह सोलापूर येथील काशीपिठाचे नूतन जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे महाअनुष्ठानही असणार आहे, अशी माहिती ‘श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी’चे अध्यक्ष श्री. धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी ‘श्री सिद्धेश्वर देवस्थान श्रावणमास उत्सव समिती’चे श्री. गुरुराज माळगे, श्री. सिद्धय्या हिरेमठ, ‘मंद्रुप मठा’चे मठाधिपती रेणुकाशिवाचार्य महास्वामी, होटगी मठाचे शांतय्या
स्वामी यांसह श्री सिद्धेश्वर देवस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे मागील २ वर्षे श्री सिद्धेश्वर मंदिर बंद असल्याने श्रावण मासानिमित्त भाविकांना दर्शनासाठी येता आले नाही; मात्र यंदाच्या वर्षी मंदिर उघडे असल्याने प्रतिवर्षीप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील भक्त मोठ्या संख्येने श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी येणार आहेत.
श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रम
१. या कार्यक्रमासमवेतच प्रतिदिन पहाटे ४ वाजता कावड मिरवणूक शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांच्या पूजेसाठी निघणार आहे. श्रावण मासानिमित्त
प्रतिदिन मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महिला आणि पुरुष भक्तांसाठी दर्शन रांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून भक्तांना विनामूल्य दासोहची (महाप्रसाद) व्यवस्था सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत करण्यात आली आहे.
२. १४ ऑगस्ट या दिवशी लिंगदीक्षाविधी कार्यक्रम होणार आहे, तर २१ ऑगस्ट या दिवशी ‘सामूहिक रुद्रपठण’ करण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला सोलापूर येथे येणार आहेत. २९ जुलैपासून ‘श्री सिद्धरामेश्वर पुराण’ या प्रवचनास प्रारंभ ! नव्या पिढीला श्री सिद्धरामेश्वरांविषयी माहिती व्हावी, यासाठी प्रतिदिन सायंकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत शिवयोगी
श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे पुराण सांगितले जाणार आहे.
२९ जुलै या दिवशी ‘श्री सिद्धरामेश्वर पुराण’ या प्रवचन कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी,
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष श्री. धर्मराज काडादी यांच्यासह ‘श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी’चे सर्व विश्वस्त आणि अन्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.