अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन केल्याच्या प्रकरणी वाघेरी येथील खाण आस्थापनाला टाळे
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या तक्रारीनंतर महसूल विभागाची कारवाई
दंडात्मक कारवाई करण्याचा तहसीलदार यांना आदेश
कणकवली – अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन केल्याच्या प्रकरणी तालुक्यातील फोंडाघाट येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सिलिका वाळू व्यावसायिक संजय आग्रे यांच्या वाघेरी येथील ‘मे. सिद्धिविनायक सिलिका मायनिंग कंपनी’ या आस्थापनाला महसूल विभागाने दंडात्मक कारवाई करण्यासह टाळे ठोकले. हा दंड वसूल करण्याचा आदेश येथील तहसीलदार यांना देण्यात आला आहे. या दंडाची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये असू शकते. या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तक्रार केली होती.
‘मे. सिद्धिविनायक सिलिका मायनिंग कंपनी’मध्ये संजय वसंत आग्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. संजना संजय आग्रे भागीदार आहेत. तालुक्यातील वाघेरी येथे सिलिका वाळू या गौण खनिजाच्या खाणीसाठी ५ वर्षे मुदतीच्या भाडेपट्टीवर भूखंड संमत करण्यात आला होता. आग्रे हे संमत खाणपट्ट्याच्या बाहेर खनिजाचा साठा करून त्याची विक्री करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.
या प्रकरणाच्या चौकशीत २८ मे २०२२ या दिवशी झालेल्या पहाणीत वरिष्ठ भूवैज्ञानिक, उपसंचालक यांचे प्रादेशिक कार्यालय; भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय कोल्हापूर यांनी संयुक्तरित्या प्रत्यक्ष पहाणी केली होती. त्या पहाणीत आग्रे दोषी आढळले होते. त्याचा अहवाल संचालक, भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर यांना सादर केला होता. या अहवालामध्ये वरील खाणपट्ट्यामध्ये उत्खनन केल्याचे नमूद केले आहे, तसेच या खाणपट्टाधारकाच्या खाणपट्ट्यामध्ये असलेल्या सिलिका वाळू या गौणखनिजाच्या साठ्याचे मोजमाप कणकवली तहसीलदार कार्यालयाने घेतले आहे.
‘मे. सिद्धिविनायक मायनिंग कंपनी’चे भागीदार सौ. आणि श्री. आग्रे यांना वाघेरी येथील गट क्रमांक १९४४/१/१९४४/१/२, क्षेत्र ४.९८ हेक्टर या क्षेत्रामध्ये आतापर्यंत केलेल्या उत्खननाविषयी, तसेच विक्री केलेल्या सिलिका वाळूविषयी म्हणणे मांडण्याची संधी दिली होती; मात्र त्यांनी मांडलेली बाजू सुनावणीत योग्य ठरली नाही. त्यामुळे वरिष्ठ भूवैज्ञानिक, उपसंचालक यांचे प्रादेशिक कार्यालय आणि भूविज्ञान अन् खनिकर्म संचालनालय, कोल्हापूर यांनी नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने खाणपट्टेधारकाने त्याच्या खाणपट्ट्यामधून आतापर्यंत विक्री केलेले तसेच सद्य:स्थितीत खाणपट्ट्यामध्ये असलेले, असे एकूण १ लाख २१ सहस्र ९८१ मेट्रिक टन सिलिका वाळू आणि ‘क्वार्टझाईट’ हे गौण खनिज अवैधरित्या उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संजय आग्रे यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ या तरतुदीच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसीलदार, कणकवली यांना कळवण्यात आले आहे.
संपादकिय भुमिकानितेश राणे यांच्या तक्रारीनंतर जागे झालेल्या प्रशासनाला हे आधीच का लक्षात आले नाही ? |