आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पुणे येथे पोलीस ठाण्यावर ३०० हून अधिक रहिवाशांचा मोर्चा !
पुणे येथे तरुणाच्या हत्येचे प्रकरण
पुणे – येथील मध्यवर्ती नाना पेठेतील नवा वाडा भागात २५ जुलैच्या मध्यरात्री पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववाद यांतून अक्षय वल्लाळ या २८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून, तसेच डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नाना पेठ नवा वाडा येथील अनुमाने ३०० हून अधिक रहिवाशांनी २९ जुलै या दिवशी समर्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
‘या गुन्ह्यात आरोपीच्या घरातील सहभागी व्यक्तींवरही गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. तसेच या हत्येमागे मुंबईतील टोळीचे ‘कनेक्शन’ असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ‘या दहशतीतून मुक्तता करावी’, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. (नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? ही मागणी पोलिसांची अकार्यक्षमता दर्शवत नाही का ? – संपादक) या प्रकरणी पोलिसांनी महेश बुरा आणि किशोर शिंदे यांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकापुण्यात टोळीयुद्ध आणि हाणामारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था शेष नसल्याचे दिसते. ही परिस्थिती पालटण्यासाठी पोलीस स्वत:चा धाक केव्हा निर्माण करणार ? |