छत्रपती संभाजीराजे यांची गड-दुर्गांच्या दुरवस्थेविषयी पुरातत्व विभागाशी चर्चा !
कोल्हापूर, २९ जुलै (वार्ता.) – छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती यांची देहली येथील पुरातत्व विभागाच्या मुख्यालयात भेट घेतली. राज्यातील पन्हाळगड, विजयदुर्ग अशा महत्त्वाच्या गडांवर वारंवार तटबंदी कोसळणे, बुरुज ढासळणे असे प्रकार होत आहेत. रायगडावरही वीज व्यवस्था, ‘रोप-वे’ यांसह अन्य काही अडचणी आहेत. यावर दूरगामी प्रभावकारक ठरणार्या उपाययोजना करणे नितांत आवश्यक आहे, असे मत संभाजीराजे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
संभाजीराजे पुढे म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाच्या वतीने किल्ले दत्तक योजना आणि तत्सम योजनांमधून केवळ पर्यटनाच्या दृष्टीने काम होते. मूळ ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था तशीच रहायची. यामुळे पर्यटनाच्या समवेत प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि जतन कार्य यांवर अधिक भर द्यावा, यासाठी मी नेहमी पाठपुरावा करत होतो. याचसाठी ‘फोर्ट फेडरेशन’ काम करणार आहे. पुरातत्व विभाग आणि ‘फोर्ट फेडरेशन’ यांच्या माध्यमातून गडांची नियमित देखभाल आणि प्रत्यक्ष संवर्धन यांवर काम केले जाणार आहे.’’