नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय !
शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतिमास ६०० रुपये मिळणार !
नवी मुंबई – शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महानगरपालिकेच्या शाळांतील १३९ विद्यार्थ्यांना पुढील ३ वर्षांसाठी प्रतिमास ६०० रुपये शिष्यवृत्ती लागू करण्यासह अन्य योजना उपलब्ध करून देऊ, असा निर्णय महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत बांगर यांनी घेतला आहे.
महानगरपालिकेच्या शाळांतील जे विद्यार्थी प्रतिवर्षी इयत्ता ५ वी आणि ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा यांमध्ये सहभागी होतात, त्यांना ‘इस्रो’सारख्या नामांकित वैज्ञानिक संस्थेची शैक्षणिक सहल घडवण्यात येणार आहे. शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी महापालिका ३ वर्षांची वैज्ञानिक मासिकाची वर्गणी भरणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रयोजनार्थ भ्रमणभाष ‘ॲप’ घेण्यासाठी १० सहस्र रुपये आर्थिक साहाय्यही देण्यात येईल.