ट्विटरला विशिष्ट माहिती काढण्यासाठीचा कायदेशीर आदेश देण्यात भारत प्रथम क्रमांकावर !
नवी देहली – ट्विटरवरून अधिकृत पत्रकार अथवा वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या विशिष्ट ट्वीट्स ‘ट्विटरने काढून टाकाव्यात’, असा कायदेशीर आदेश देण्यामध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती ट्विटरने दिली आहे. ही माहिती जुलै ते डिसेंबर २०२१ या कालावधीतील आहे. यासमवेतच ट्विटरने सांगितले की, याच कालावधीत ट्विटर खात्यांविषयी माहिती मागण्याच्या विनंत्यांमध्ये भारत अमेरिकेनंतर दुसर्या क्रमांकावर होता. काही ट्वीट्स या ‘समाजविघातक’ अथवा ‘देशविरोधी’ असल्याचे कारण देत विविध देशांकडून त्या ट्वीट्स त्यांच्या देशात दाखवण्यावर बंदी लादण्याचा आदेश दिला जातो. त्याच्याशी संबंधित वरील आकडेवारी आहे.
ट्विटरने सांगितले की, जुलै ते डिसेंबर २०२१ या कालावधीत अधिकृत पत्रकार, तसेच वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या एकूण ३४९ खात्यांवर ३२६ कायदेशीर कारवायांचे आदेश देण्यात आले. यांत ट्विटरला भारताकडून ११४, तुर्कीये ७८, रशिया ५५, तर पाकिस्तानकडून ४८ आदेश देण्यात आले होते.