रांगोळीची प्रथा, तिचे प्रकार आणि तिची सद्य:स्थिती

ठिपक्यांच्या रांगोळीचे प्रतिकात्मक चित्र

१. रांगोळी काढण्याचे दोन प्रकार असणे

१ अ. ठिपक्यांची रांगोळी : ‘महाराष्ट्रात रांगोळी लोकप्रिय आहे आणि ठिपके काढून ते जोडून रांगोळी काढण्याची प्रथा आहे.

१ आ. मुक्तहस्त चित्रांची रांगोळी : स्वस्तिक, चंद्र, सूर्य, लक्ष्मीची पावले, गोपद्म, महिरप इत्यादी आकृती मुक्तहस्त चित्राप्रमाणे (‘फ्री हँड ड्रॉईंग’) काढल्या जातात.

२. पूर्वापार प्रथेनुसार आजही काही खेडेगावांतून अंगणात सडा घालून त्यावर रांगोळी काढूनच स्त्रियांचा दिवस चालू होत असणे

पूर्वी भूमी शेणाने सारवली जात. सारवलेल्या भूमीवर शुभ्र रांगोळीचे रेखाटन आणि त्यात हळदी-कुंकवाची चिमूट घालण्याची पद्धत होती. आजसुद्धा काही खेडेगावांतून ही प्रथा पाळली जाते, तसेच सकाळी उठल्यावर अंगणात पाण्याचा सडा घालून त्यावर छोटीशी रांगोळी, घराच्या उंबर्‍यावर, तुळशी वृंदावनापाशी आणि देवघरात रांगोळी काढूनच स्त्रियांचा दिवस चालू होत असे.

३. आजकाल पारंपरिक रांगोळ्यांचे ‘स्टिकर्स’ही बाजारात विकत मिळतात. ते प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघराजवळ चिकटवून लोक स्वतःची हौस भागवून घेतात.

४. सणांच्या काळात रांगोळीला अधिक महत्त्व असणे आणि सध्या पत्रा किंवा प्लास्टिक यांपासून बनवलेल्या छापांद्वारे आकर्षक रांगोळ्या काढल्या जाणे

श्रावण मास, गौरी-गणपती आणि दिवाळी या वेळी रांगोळीला अधिक महत्त्व आहे. सण जवळ आले की, हळदीपासून बनवलेले अत्यंत आकर्षक असे रंग बाजारात विक्रीस येतात. या रंगांनी पांढरी रांगोळी अधिक आकर्षक बनते, तसेच पत्र्यापासून किंवा प्लास्टिकपासून बनवलेले छापही (मोल्डस) मिळतात. त्या छापांमध्ये रांगोळीची पूड घालून छाप उमटवले की, एकसारख्या रांगोळ्या काढता येतात. तसेच रांगोळीच्या साहाय्याने देवतांची चित्रे काढण्याची कला जोपासली गेली आहे.

५. ‘संस्कारभारती’च्या रांगोळ्या काढण्याच्या कार्यामुळे रांगोळीची कला विदेशात पोचणे

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी शेकडो कलाकारांच्या साहाय्याने काही किलोमीटर लांबीच्या रांगोळ्या ही ‘संस्कारभारती’ची विशेषता झाली आहे. त्यामुळे रांगोळी ही हॉलंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, ब्रिटन आणि बेल्जियम इत्यादी देशांतही पोचली आहे.

६. रांगोळीला उठाव यावा; म्हणून गेरू या तपकिरी-लाल रंगाच्या मातीने रांगोळी काढण्याची जागा सारवून घेतात. तसेच रांगोळीत रंग भरून पूर्ण झाली की, त्याभोवती पणत्या किंवा मेणबत्या लावून ठेवतात.’

(साभार : ‘श्रीमत् पूर्णानंदाय’, दिवाळी विशेषांक २०१४)