ब्राह्मण समाजाला वर्ष १९४८ पासून नियोजनपूर्वक लक्ष्य केले जाते आहे ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे
रंगा दातेलिखित ‘१९४८ चे अग्नितांडव’ पुस्तकाचा पुणे येथे प्रकाशन सोहळा
पुणे – मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतर वर्ष १९४८ मध्ये समस्त ब्राह्मण समाजावर झालेले अत्याचार विसरता येणार नाहीत, हा रक्तरंजित इतिहास पुढच्या पिढीला समजला पाहिजे. यासाठीच ‘१९४८ चे अग्नितांडव’ हे पुस्तक वाचवतही नाही आणि सोडवतही नाही, असे झाले आहे. ब्राह्मण समाजाला वर्ष १९४८ पासून नियोजनपूर्वक लक्ष्य केले जात आहे. देशातील अशा सर्वच दबलेल्या विषयांवर आता खरा इतिहास लिहिला जात आहे, त्याचा अनेक तथाकथित पुरोगाम्यांना त्रास होऊ लागला आहे, असे परखड मत ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ नियतकालिकाच्या वतीने प्रकाशित आणि रंगा दातेलिखित पुस्तकाचे प्रकाशन २३ जुलै या दिवशी डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी लेखक रंगा दाते, प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी, ‘महाराष्ट्र चित्पावन संघा’चे अशोक वझे व्यासपिठावर उपस्थित होते.
डॉ. शेवडे म्हणाले की, गांधीहत्येनंतर ठरवून आणि नियोजनपूर्वक महाराष्ट्रातील ब्राह्मणांवर अत्याचार केले गेले. लोकमान्य टिळकांनाही काँग्रेसने कायमच दुर्लक्षित ठेवले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर अजूनही टिकेला सामोरे जावे लागत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टिंगलटवाळी केली जात आहे. यासाठीच खरा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे.
लेखक रंगा दाते म्हणाले की, हे पुस्तक खर्या इतिहासावर आणि अनुभवांवर आधारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाची घरेदारे जाळली गेली, महिलांवर अत्याचार करण्यात आले, अनेकांना बेघर केले गेले. ब्राह्मण समाजाच्या झालेल्या या भयंकर हानीची भरपाई सरकारने केली पाहिजे. त्याला वाचा फोडण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.