मराठीत बोलणे, हा सहस्रावधी मराठी लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे ! – सचिन खेडेकर, ज्येष्ठ अभिनेते
मुंबई – कुठलीही वस्तू विक्री करणार्यांचा (‘मार्केटिंग’वाल्यांचा) दूरभाष येतो, तेव्हा आपल्याला त्यांच्याशी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलावे लागते. त्या वेळी तुम्ही मराठी बोलण्याचा आग्रह धरा. मराठी बोलण्याचा आग्रह धरणे, हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही. ‘मार्केटिंग’वाल्यांशी मराठीत बोलणे, हा सहस्रावधी मराठी लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी ‘सोनी टीव्ही’वरील ‘कोण होणार करोडपती ?’ या कार्यक्रमात केले.
सचिन खेडेकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात त्यांनी केलेलं आवाहन मराठी माणसाच्या मनाला भिडणारं आहे. पाहा व्हिडीओ.#sachinkhedekar #Marathi https://t.co/vP8U3TyN7i
— Lokmat (@lokmat) July 28, 2022
सचिन खेडेकर पुढे म्हणाले, ‘‘कॉल सेंटर’ला दूरभाष करतांना तुम्ही इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांच्या पर्यायांपैकी मराठी निवडता. ‘ए.टी.एम्.’मधून पैसे काढतांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांपैकीही तुम्ही मराठीचा पर्याय निवडता. त्याप्रमाणे ‘मार्केटिंग’वाल्यांशी बोलतांना त्यांनी हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून बोलायला प्रारंभ केल्यास तुम्ही मराठीतच बोला. मराठीचा आग्रह धरा; कारण आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी किंवा व्यवसाय मिळेल. आपण एक पाऊल पुढे टाकूया. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल.’’