मसाला पिकांची (आले, लवंग आणि दालचिनी यांची) लागवड कशी करावी ?
आले, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि जायफळ या पिकांची नारळ अन् सुपारी यांच्या बागेत मिश्रपीक म्हणून लागवड करता येते. काळी मिरीची स्वतंत्र लागवड करता येते, तसेच आल्याची स्वतंत्र लागवड करणेही लाभदायी ठरते. आजच्या लेखात आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची महिती येथे देत आहोत. भाग १
१. आले
१ अ. हवामान आणि भूमी : आले हे पीक शक्यतो मध्यम आणि अधिक पावसाच्या प्रदेशात सर्व प्रकारच्या भूमींवर घेतले जाते. या पिकाचे उत्पन्न मध्यम आणि भुसभुशीत भूमीमध्ये चांगले येते.
१ आ. पूर्वमशागत : या पिकाची वाढ चांगली होण्यासाठी उभ्या-आडव्या नांगराच्या पाळ्या देऊन मातीची ठेकळे फोडून घ्यावीत आणि कुळवाच्या १-२ पाळ्या देऊन भूमी सिद्ध करावी. इतर पिकांचे अवशेष आणि दसकटे वेचून घेऊन भूमी स्वच्छ करावी.
१ इ. सुधारित वाण (जाती) : माहिम, रिओ-डी-जानेरो, कालीकत, चिनी जमैका, जपानी, कोचिन, सुरूची, सुरभी, सुप्रभात, वायनाड, मारन इत्यादी सुधारित वाणांची लागवड करावी.
१ ई. लागवडीचा कालावधी आणि लागवड : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मे मासाच्या शेवटपर्र्यंत लागवड करावी. आल्याची लागवड सपाट वाफे, गादी वाफे (रूंद वरंबा) आणि सरी पद्धतीने करता येते. भूमी हलकी असल्यास ३ x २ मीटरचे सपाट वाफे करावेत आणि २२.५ ते ३० सें.मी. भूमीच्या प्रकारानुसार दोन रोपे अन् ओळ यांत अंतर ठेवावे. मध्यम आणि भारी भूमीत सरी वरंबे सिद्ध करावेत. दोन वरंब्यातील अंतर ६० सें.मी. ठेवावे आणि सरीच्या दोन्ही बाजूस २२.५ ते ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. गादी वाफे सिद्ध करतांना २० सें.मी. उंचीचे, १ मीटर रूंदीचे आणि ३ मीटर लांबीचे गादी वाफे करावेत. गादी वाफ्यावर भूमीच्या प्रकारानुसार दोन ओळींतील आणि दोन रोपांतील अंतर २२.५ ते ३० सें.मी. ठेवून लागवड करावी.
१ उ. बियाणे : २५ ते ४५ ग्रॅम वजनाचे डोळे फुगलेले, तसेच १८ ते २० क्विंटल बियाणे प्रति हेक्टर असावे.
१ ऊ. बीज प्रक्रिया : ‘इकॅलक्स’ २५ टक्के (२० मि.ली.) + ‘बाविस्टीन’ १५ ग्रॅम + १० लि. पाण्याच्या द्रावणात बियाणे १५ ते २० मिनिटे बुडवून लागवडीस वापरावे.
१ ए. खत व्यवस्थापन : पूर्वमशागतीच्या वेळी २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत चांगले मिसळून घ्यावे. १२० किलो नत्र प्रति हेक्टरी ३ समान हप्त्यात – लागणीनंतर पहिला हप्ता दीड मासाने, त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता एकेक मासाच्या अंतराने द्यावा. ७५ किलो स्फुरद आणि ७५किलो पालाश प्रति हेक्टरी लागवडीपूर्वी द्यावे, तसेच प्रति हेक्टरी २ टन निंबोळी किंवा करंजी पेंड आल्याची उटाळणी करतांना लागवडीनंतर अडीच ते तीन मासांनी वापरावी.
१ ऐ. आंतरमशागत : आवश्यकतेनुसार ३ – ४ खुरपण्या करून तणांचा बंदोबस्त करावा. खुरपणी करतांना भूमी अधिक तुडवली जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
१ ओ. पीक संरक्षण : पाने खाणारी अळी, रस शोषणारी किड, पाने गुंडाळणार्या अळ्या इत्यादी किडीच्या नियंत्रणासाठी ‘डायमेथोएट’ १० लिटर पाण्यामध्ये १५ मि.ली. किंवा ‘क्लोरोपायरीफॉस’ २५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ‘कॉपरऑक्झिक्लोराईड’ २५ ग्रॅम किंवा ‘बाविस्टीन’ २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार २ – ३ फवारण्या कराव्यात.
१ औ. पाणी व्यवस्थापन : भूमीच्या मगदुरानुसार (क्षमतेनुसार) ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबक किंवा तुषार सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केल्यास उत्पादन वाढते आणि पाण्याची बचतसुद्धा होते.
१ अं. काढणी : लागवडीनंतर ८ ते १० मासांनी पाने पिवळी पडल्यावर किंवा वाळल्यावर कुदळीच्या साहाय्याने खांदणी करून काढणी करावी. कंद स्वच्छ करून सावलीत सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
१ क. उत्पन्न : १५ ते २० टन प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. आल्यापासून खुंट करावयाचे असल्यास कंद रात्रभर पाण्यात भिजवावेत, स्वच्छ करून घ्यावे, साल काढावी आणि ७ ते ८ दिवस उन्हात वाळवावी.
२. लवंग
मसाल्यात वापरण्यात येणारी लवंग म्हणजे फुले उमलण्यापूर्वी साधारण फिकट नारिंगी रंगाची वाळलेली कळी होय; परंतु त्या तशाच वाढू दिल्यास त्यांचे फुलात आणि नंतर जांभळासारख्या फळात रूपांतर होते. अशा फळांचा उपयोग रोपे सिद्ध करण्यासाठी केला जातो.
२ अ. लागवड : नारळाच्या चार झाडांच्या मध्यभागी (चौफुलीवर) दीड ते दोन वर्षांचे रोप लावावे. सुपारी बागेत मात्र सलग २ चौकोन मोकळे सोडून तिसर्या चौकोनात मध्यभागी रोप लावावे. अशा प्रकारे ठरलेल्या अंतरावर ७५ x ७५ x ७५ सें.मी. आकाराचे खड्डे उन्हाळ्यात काढून प्रत्येक खड्ड्यात २ ते ३ टोपल्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि २ किलो ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ अन् ७५ ग्रॅम १.५ टक्के ‘क्लोरोपायरिफॉस’ पावडर मातीत मिसळून खड्डे सिद्ध ठेवावेत. लागवडीसाठी २ वर्षे वयाचे निरोगी रोप वापरावे. पाण्याची सोय असल्यास वर्षभर लागवड करता येते. पावसाळ्यात लागवड करावयाची झाल्यास पावसाचा जोर न्यून झाल्यावर लागवड करणे लाभदायी ठरते.
२ आ. आंतर मशागत : भूमीत सतत ओलावा असणे लवंगाच्या झाडांना पुष्कळ मानवते; परंतु दलदलीची किंवा कोरडी भूमी नसावी. त्यादृष्टीने पिकास पाणी व्यवस्थापन करावे. लवंगाच्या झाडांना आवश्यक तेवढी (५० टक्के) सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी. शक्यतो दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे प्रखर सूर्यकिरणांपासून पिकाचा बचाव करावा.
२ इ. पीक संरक्षण : किडीच्या बंदोबस्तासाठी ‘क्लोरोपायरीफॉस’ २ ते २.५ मि.ली.प्रती लिटर पाणी या प्रमाणात आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
२ ई. काढणी आणि उत्पन्न : लागवडीनंतर ५ ते ६ वर्षांनी झाडास कळ्या लागतात. झाडापासून जानेवारी ते एप्रिल या काळात उत्पन्न मिळते. कळ्यांचा घुमट पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारिंगी छटा प्राप्त होते. अशाच कळ्यांची काढणी करावी आणि त्या उन्हात ४ ते ५ दिवस वाळवाव्यात. १५ ते २० वर्षे वयाच्या झाडापासून १ ते २ किलोपर्यंत वाळलेल्या लवंगा मिळतात.
३. दालचिनी
दालचिनीच्या झाडाची साल ‘दालचिनी’ म्हणून, तर पानांचा ‘तमालपत्र’ म्हणून मसाल्यात उपयोग होतो. विद्यापिठाने ‘कोकण तेज’ नावाची दालचिनीची सुधारित जात निर्माण केली आहे. या जातीची दालचिनी उत्तम प्रतीची आणि सुगंधी आहे. दालचिनीच्या ‘नित्यश्री’ आणि ‘नवश्री’ या इतर प्रसारित जाती आहेत. तमालपत्रासाठी ‘कोकण तेजपत्ता’ आणि ‘कोकण कॅसिया’ या जाती विकसित केल्या आहेत.
३ अ. लागवड : अती पावसाळा सोडून कोणत्याही मासात गुटी कलमाद्वारे लागवड करावी. नारळाच्या बागेत लागवड करावयाची झाल्यास त्याच्या झाडापासून २ मीटर अंतर सोडून किंवा सलग लागवड करावयाची झाल्यास दोन ओळीत आणि दोन झाडांत सव्वा मीटर अंतर ठेवून ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. चांगली माती + २ घमेली शेणखत किंवा कंपोस्ट खत, २५० ग्रॅम ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ आणि ‘क्लोरोपायरीफॉस’ १.५ टक्के, पावडर ६० ग्रॅम यांच्या मिश्रणाने खड्डे भरून सिद्ध ठेवावेत. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमाची लागवड करावी.
३ आ. पाणी व्यवस्थापन : नारळाला जसे पाणी देतात, त्याच पद्धतीने हंगामानुसार पाणी द्यावे. रेताड भूमी असल्यास मात्र २ ते ३ दिवसाआड पाणी द्यावे.
३ इ. खते : १० वर्षांपासून प्रती झाडास २० किलो शेणखत, ४०० ग्रॅम युरिया, १ सहस्र २५० ग्रॅम ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ आणि ३५० ग्रॅम ‘म्युरेट ऑफ पोटॅश’ ही खते चरातून द्यावी. लहान झाडांना वयोमानानुसार अल्प प्रमाणात वरील खतांची मात्रा द्यावी.
३ ई. पीक संरक्षण : किडींच्या नियंत्रणासाठी आवश्यकता भासल्यास २ मि.ली. ‘क्विनॉलफॉस’ किंवा १ मि.ली. ‘डायमेथोएट’ प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
३ उ. काढणी आणि उत्पन्न : दालचिनीचे गुटी कलमाचे झाड ३ वर्षे वयाचे झाल्यावर सालीची पहिली काढणी करावी. पुढे १ – २ वर्षांनंतर सिद्ध झालेल्या फांद्यांची काढणी करावी. साल काढणीचा हंगाम नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. साल काढणीपूर्वी चाकूच्या साहाय्याने २ सें.मी. चौकोनी काप घेऊन साल काढावी. साल झाडापासून सहज सुटी झाली आहे ना, याची निश्चिती करावी. नंतर हे झाड भूमीपासून २० ते २५ सें.मी. अंतरावर करवतीच्या किंवा कोयत्याच्या साहाय्याने कापावे आणि कापलेल्या फांद्यांवरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल असेल, ती काढून सुकवावी. अशा रितीने सालीपासून दालचिनी, तर सावलीत पाने सुकवून तमालपत्र सिद्ध करतात.
काढणीचे काम सकाळी लवकर करावे. फांद्या कापल्यानंतर त्यांचे एक फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने दोन उभे काप देऊन साल काढावी. सालीचे पुट्टे काढलेल्या काठ्यांवर पुन्हा बांधावेत आणि सावलीत ४ ते ६ दिवस वाळवावेत. त्यानंतर साल उन्हात २ घंटे वाळवून ही दालचिनी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात साठवावी. कापलेल्या भागाखालून ४ – ५ नवीन फांद्या येऊन त्या सरळ वाढतात. १ – २ वर्षांनी या फांद्या १ ते १.२५ मीटर लांब आणि पेन्सिलच्या जाडीइतक्या झाल्यावर, तसेच अनुमाने ९० टक्के खाकी रंगाची साल असतांना त्यांची तोडणी करावी. तोडणी करतांना फांद्यांवर दोन पेर ठेवावेत. अनुमाने ८ वर्षांनंतर प्रतिवर्षी फांद्या तोडणीसाठी मिळतात. दालचिनीच्या सालीचे आणि पानांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नियमित हंगामात तोडणीनंतर पाच फुटवे (बुंध्यातून फुटणारी नवी पालवी) ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे.
सातव्या वर्षानंतर एका झाडापासून ३०० ग्रॅम दालचिनी साल आणि ५०० ग्रॅम वाळलेली पाने (तमालपत्र) मिळतात. (क्रमश:)
संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), एम्.एस्सी. (ॲग्रिकल्चर), पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२२)