सर्व संशयितांना एकदा प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्यात यावे ! – अधिवक्ता समीर पटवर्धन
कॉ. पानसरे हत्या प्रकरण
कोल्हापूर, २७ जुलै (वार्ता.) – कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सर्व आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात आहेत. कर्नाटक येथील कारागृहात असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी ८०० किलोमीटर अंतर जावे लागते आणि इतके होऊनही भेटीसाठी केवळ १० मिनिटे मिळतात. तेथील संशयितांना माझ्याशी सविस्तर बोलायचे आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तेथील आरोपींना केवळ एकदाच न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे दोष निश्चितीपूर्वी सर्व संशयितांना एकदा प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करावे, अशी मागणी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायाधिशांकडे केली. ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू असून पुढील सुनावणी ५ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.
या खटल्यात एकूण १२ संशयित आरोपी असून २७ जुलै या दिवशी त्यातील येरवडा, पुणे येथील कारागृहात असणारे सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना प्रत्यक्ष उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणात सध्या जामिनावर असलेले समीर गायकवाड हेही प्रत्यक्ष उपस्थित होते. कर्नाटकमधील उर्वरित संशयितांना उपस्थित करण्यात आलेले नव्हते. सरकारपक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली.
या संदर्भात युक्तीवाद करतांना अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले, ‘‘आजपर्यंत प्रत्येक वेळी बेंगळुरू येथील कारागृहातील संशयितांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे जोडले होते. त्याद्वारे संपर्क करण्यास मर्यादा येतात. यातील संशयितांना भाषेची अडचण आहे. मी बेंगळुरू येथे त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी गेलो असता मला १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे सर्व संशयितांना प्रत्यक्ष उपस्थित केल्यास त्यांच्याशी खटल्याविषयी बोलता येईल, तसेच त्यांच्या अडचणी समजून घेता येतील.’’
अन्य घडामोडी
१. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयाने ‘‘तुम्हाला काही सांगायचे आहे का ?’’, अशी विचारणा केली असता डॉ. तावडे यांनी ‘‘मला अधिवक्त्यांशी बोलायचे आहे. त्यांना काही गोष्टी सांगायच्या आहेत’’, असे सांगितले. यावर न्यायालयाने डॉ. तावडे यांना ‘अधिवक्ता समीर पटवर्धन यांना भेटण्यासाठी स्वतंत्र वेळ उपलब्ध करून देण्यात यावा’, अशी सूचना दिली.
२. पुढील दिनांकास सर्व संशयितांना प्रत्यक्ष उपस्थित करण्यात येईल, असे सरकार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.