सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात असणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !
१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या आजारपणात त्यांच्या सेवेत असणार्या साधिका सौ. सुचेता नाईक यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या निधनानंतर आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. प्रत्येक कृती करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करणे : ‘सौ. शालिनी मराठेकाकूंना कर्करोग झाला होता. त्यावर पणजी येथील रुग्णालयात त्यांच्यावर किरणोपचाराचे (‘रेडिएशन’चे) उपचार चालू होते. त्या वेळी मी ३ दिवस त्यांच्या समवेत होते. त्या उपचार घेण्यापूर्वी आणि उपचारानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करायच्या. प्रत्येक कृती करण्यापूर्वी ‘गुरुदेवा, तुम्हीच ही कृती करून घेत आहात’, असे म्हणायच्या आणि ती कृती झाल्यावर ‘गुरुदेवा, ही कृती तुम्हीच करून घेतलीत’, असे म्हणायच्या.
१ आ. इतरांचा वेळ जाऊ नये, यासाठी दक्ष असणे : आम्ही पणजीला रुग्णालयात उपचारासाठी जाण्यापूर्वी त्या रुग्णालयात घेऊन जाणार्या वाहन चालकालाही ‘आम्ही सिद्ध आहोत’, असा भ्रमणभाष करायला मला सांगायच्या आणि ज्यांच्या घरी जायचे आहे, त्यांना आठवणीने ‘आम्ही निघालो आहोत’, असा भ्रमणभाष करायला मला सांगायच्या. ‘आपल्यामुळे कुणाला काही अडचण यायला नको’, असा त्यांचा विचार असायचा.
१ इ. परिस्थिती स्वीकारणे : काकू म्हणायच्या, ‘आतापर्यंत मला काही दुखणे नव्हते. आता म्हातारपणी हे भोगणे आले; परंतु याच जन्मात हे भोगून संपवायचे आहे ना ! आपण आहे ती परिस्थिती स्वीकारली पाहिजे. गुरुदेव माझी काळजी घेणारच आहेत आणि हे सर्व भोगायला बळही तेच देणार आहेत. परिस्थिती स्वीकारता येण्यासाठी आपण केवळ त्यांना प्रार्थना करायला हवी.’
१ ई. अनुसंधानात रहाणे : सौ. मराठेकाकूंची शारीरिक स्थिती बरी नसली, तरी त्या देवाच्या अनुसंधानात रहायच्या. त्या प.पू. भक्तराज महाराज यांची भजने गुणगुणायच्या. आषाढी एकादशीच्या दिवशी त्या बराच वेळ २ – ३ विठ्ठलाचे अभंग गुणगुणत होत्या.
१ उ. इतरांना आनंद मिळण्यासाठी प्रत्येक कृती करणे : १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या दिवशी (सौ.) मराठेकाकूंची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना बराच थकवा होता; परंतु त्या मला म्हणाल्या, ‘‘मला बघून इतरांना आनंद वाटावा आणि काकांनाही (यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना) आनंद मिळावा; म्हणून आज मला काकांनी आणून दिलेली साडी नेसवा.’’ त्या दिवशी काकू पुष्कळ सुंदर दिसत होत्या.
२. अनुभूती
शालिनीकाकूंचे निधन झाल्यावर त्यांच्या दोन्ही हातांचे तळवे महालक्ष्मीसारखे (महाराष्ट्रात भाद्रपद मासात उभ्या गौरी असतात. त्यांना हात लावल्यावर दिसतात तसे) दिसत होते. त्यांची ओटी भरतांना मी ‘श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरत आहे’, असे जाणवून मला शांत वाटले.
‘हे गुरुदेवा, सौ. शालिनीकाकूंचे गुण मला अंगी बाणवता येऊ देत’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे. सौ. शालिनीकाकूंची सेवा करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुचेता नाईक, ढवळी, फोंडा, गोवा. (१७.७.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |