बत्तीस शिराळा येथील नागपंचमीला अनुमती द्या ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना
कोल्हापूर – ‘पूर्वापार चालू असलेली बत्तीस शिराळा येथे नागपंचमी साजरी करण्यास अनुमती द्या आणि नागाला वन्यजीव प्राण्यांच्या सूचीतून वगळा’, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत केली.
या प्रसंगी धैर्यशील माने म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातील शिराळ्याची नागपंचमी ही भारतीय संस्कृतीची एक वेगळी ओळख असून अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या परंपरेला जतन करणे आवश्यक आहे. या सणावर मागील काही वर्षांपासून निर्बंध आहेत. श्रावण मासाच्या पंचमीला शिराळा गावामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा महायोगी श्री शिव महाराजांनी ९०० च्या शतकापासून चालू केली. ही परंपरा वर्ष २००२ पर्यंत चालू होती; परंतु ‘भारतीय वन्यजीव कायदा १९७२’नुसार ही परंपरा खंडित झाली. तथापि घटनेच्या कलम २५ नुसार आवडीच्या धर्माचा आचार, उच्चार, प्रसार करण्यास अनुमती आहे आणि २६ नुसार धार्मिक कार्याचे पालन करण्याचा अधिकार असल्याने नागपंचमीला अनुमती देण्यात यावी.’’