पुण्यातून मागील ७ मासांत ८४० युवती आणि महिला बेपत्ता !
यांपैकी ३९६ जणींचा शोध घेण्यात यश
पुणे – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२२ मधील मागील ७ मासांत अनुमाने ८४० युवती आणि महिला बेपत्ता झाल्या होत्या, त्यांतील ३९६ जणींचा शोध लागला आहे. जून मासात सर्वाधिक १८६ महिला बेपत्ता झाल्या असून त्यानंतर मे मध्ये १३५ महिला बेपत्ता झाल्या आहेत. पुणे ग्रामीण भागात गेल्या ७ मासांत महिला गायब होण्याच्या जवळपास ७४३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलिसांनी ‘मुस्कान योजने’अंतर्गत या युवती आणि महिला यांचा शोध चालू केला आहे. (महिलांच्या शोधाच्या योजनेचे नाव मराठीत का ठेवले नाही ? – संपादक)
या संदर्भात महिला आणि बाल कार्यकर्त्या यामिनी अदाबे म्हणाल्या की, महिला बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असली, तरी मानवी तस्करीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रेमप्रकरणांमुळे किंवा कौटुंबिक वादामुळे महिला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणांमध्ये त्या कुटुंबातील काही सदस्य किंवा मित्राच्या संपर्कात असतात; परंतु शोध न करता येणार्या महिलांची वाढती संख्या सर्वांसाठीच चिंताजनक आहे. (शोध न लागलेल्या युवती आणि महिला नेमक्या किती आहेत ?, याची आकडेवारी नेमकेपणाने समोर आली पाहिजे ! – संपादक)
याविषयी शिवसेनेच्या नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे म्हणाल्या की, मी मागील २ वर्षांपासून या प्रकरणांचा पाठपुरावा करत असून याविषयी माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली होती. बलात्काराच्या घटनांमध्ये घट झाली आहे; परंतु त्याच वेळी कौटुंबिक हिंसाचारामुळे महिला हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांची सुटका केल्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशनही चालू करावे. आम्ही आमच्या ‘स्त्री आधार केंद्रा’च्या माध्यमातून हरवलेल्या महिलांविषयी जनजागृती मोहीम चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी मृत झालेल्या अनोळखी महिलांची छायाचित्रे प्रकाशित केल्यास त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या पालकांना मिळू शकेल. याविषयी विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) मनोज लोहिया यांच्याशी चर्चा चालू असून ते याविषयी सकारात्मक आहेत.
पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक अण्णा माने म्हणाले की, महिला बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक वाद, नातेसंबंध, प्रियकराकडून लग्नाच्या बहाण्याने आमीष दाखवणे अशी अनेक कारणे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार महिलांचे अपहरण झाल्याची प्रकरणे फारच अल्प आहेत.
संपादकीय भूमिका
|