मुंबई येथील श्री. दिव्यांक हिरेकर (वय २० वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथे झालेल्या युवा साधना शिबिराला येण्यापूर्वी आलेले अडथळे आणि नंतर आलेल्या अनुभूती
१. शिबिराला येण्यापूर्वी आलेले अडथळे
‘माझे युवा शिबिरासाठी रामनाथी, गोवा येथे येण्याचे ठरले. तेव्हा त्यात पुष्कळ अडथळे आले. माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला पुष्कळ दुखापत झाल्याने मी शिबिरासाठी येण्याचे टाळत होतो.
२. शिबिरात आलेल्या अनुभूती
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मानस अभिषेक करतांना ‘गुरुदेव डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे जाणवणे : मी रामनाथी आश्रमात आलो. तेव्हा ‘भाववृद्धीचा प्रयोग कसा करावा ?’, हेही मला ठाऊक नव्हते; पण नामजप करतांना माझ्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर अभिषेक करण्याचा विचार आला. त्याप्रमाणे मी मानसरित्या त्यांच्या चरणांवर अभिषेक केला. तेव्हा मला ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे जाणवले.
२ आ. संतांच्या सत्संगाच्या वेळी त्यांच्या पायाचा अंगठा थरथरत असल्याने अनिष्ट शक्तींचे त्यांच्या चैतन्याशी सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याचे जाणवणे आणि संतांच्या बोलण्यातून शंकांचे निरसन होणे : संतांच्या सत्संगाच्या वेळी त्यांच्या पायाचा अंगठा थरथरत होता. तेव्हा मला वाटले, ‘हे अनिष्ट शक्तींचे आक्रमण असून त्यांचे संतांच्या चैतन्याशी सूक्ष्मातून युद्ध चालले आहे.’ हे मी संतांना सांगितल्यावर ते हसतमुखाने म्हणाले, ‘‘हे पहा ! असे सर्व आहे. हे केवळ सनातनचा साधकच बोलू शकतो.’’ मला असलेल्या शंकांचे निरसन त्यांनी अगदी नेमकेपणाने केले.
२ इ. पूर्णवेळ साधना करण्याचा विचार आल्यावर मनात नकारात्मक विचार येणे आणि प्रार्थना केल्यावर ‘श्रीकृष्ण अन् परात्पर गुरु डॉक्टर बोलवत आहेत’, अशी अनुभूती येणे : सत्संगानंतर मला आध्यात्मिक उन्नतीची तीव्र ओढ लागली; म्हणून मी पूर्णवेळ साधना करण्याविषयी अनुमती मागितली. त्या वेळी अनिष्ट शक्ती आणि मायेचे आवरण यांमुळे माझ्या मनात ‘गुरुदेव मला जवळ घेतील का ?’, असा नकारात्मक विचार आला. तेव्हा नामजप करण्याची उद्घोषणा झाली. नामजप करण्यासाठी डोळे मिटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर श्रीकृष्णाचे चित्र आले. त्यातून ‘श्रीकृष्ण हसतमुखाने माझ्याजवळ येत आहे’, असे मला वाटले. काही वेळासाठी मी डोळे उघडले आणि पुन्हा डोळे मिटून नामजप करतांना ‘श्रीकृष्ण परात्पर गुरु डॉक्टरांच्या गळ्यात हात टाकून उभा आहे अन् ते दोघे मला आनंदाने त्यांच्याजवळ बोलावत आहेत’, असे मला वाटले. मी त्यांच्याजवळ गेल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर माझा हात धरून मला एका बसमध्ये चढवत आहेत’, असे मला दिसले. त्या बसचे नुसते दार दिसत होते. बाकी सर्व प्रकाशमय असून चालक स्वतः श्रीकृष्ण होता.
२ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी झोप अनावर होणे आणि प्रार्थना केल्यावर जाग येऊन थंड अन् अत्यंत कोमल हाताचा स्पर्श जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी मला पुष्कळ झोप येत होती. तेव्हा मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी प्रार्थना केली, ‘मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे चैतन्य ग्रहण करता येऊ देत. त्यांच्या चैतन्याने माझे स्वभावदोष निर्मूलन होऊ देत. चैतन्य ग्रहण करण्यासाठी मला जागे रहाता येऊ देत.’ ही प्रार्थना करून मी पुन्हा लक्षपूर्वक ऐकू लागलो. मला पुन्हा झोप आली. तेव्हा एका थंड आणि अत्यंत कोमल हाताचा स्पर्श माझ्या कानाला जाणवला. तो एवढा सजीव होता की, मला जाग तर आलीच; परंतु मी वळूनही पाहिले. तेव्हा तेथे कुणीही नव्हते. माझ्या डोळ्यांपुढे केवळ निळ्या रंगाचा प्रकाश येऊन गेला.’
– श्री. दिव्यांक हिरेकर (वय २० वर्षे), नवी मुंबई (२४.११.२०२१)
|